सौजन्य - सोशल मिडीया
पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट बसस्थानकाच्या आवारातील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा येथील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, स्वारगेटचा परिसर आणि बसस्थानक कायमच धोकादायक असल्याचे आतापर्यंत झालेल्या एकूण घटना आणि केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. कारण, सातत्याने या परिसरात लुटमार, मोबाईल हिसकावणे, चोऱ्या अशा घटना घडतात. तर, बसस्थानकाच्या आवारात प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: या भागात गुन्हेगारांचा वावर रात्री मोठ्या प्रमाणातच असतो, रात्री-अपरात्री रिक्षा चालक बहुतांश हे गुन्हेगार असल्याचे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार समजते.
स्वारगेट बसस्थानकातील २६ वर्षीय तरुणीवर अत्याचारप्रकरणानंतर या परिसरातील अवैध गोष्टी, गुन्हेगारी, प्रवाशी सुरक्षा तसेच महिला व तरुणींच्या छेडछाड व सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, स्वारगेटचा पुर्ण परिसर तसेच बसस्थानकाची पाहणीनंतर तसेच पुर्वइतिहास पाहता हा भाग कायम सर्वसामान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी केवळ धोकादायकच असल्याचे दिसत आहे.
स्वारगेट स्थानक किंवा बाहेरच्या परिसरात कायम गर्दी असते. रात्री देखील बहुतांश प्रवाशी असतात. प्रवाशांसाठी मग येथे चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मुख्यत: रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात असतात. बऱ्यापैकी प्रमुख चौकात मोठा प्रकाश देखील असतो. अनेकवेळा बाहेरून आलेले प्रवाशी पीएमपी बसची वाट पाहत थांबलेले असतात. तर अनेकजन पहाटे बस पकडण्यासाठी मध्यरात्रीच येथे येऊन थांबतात. अनेकांना बस न भेटल्याने स्वारगेट बसस्थानकात अडकून देखील पडलेले असतात. त्याचाच फायदा हे गुन्हेगार घेतात. प्रवाशांना लुटणे, त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरणे किंवा अनेकवेळा जबरदस्तीने व धमकावून त्यांच्याकडील मोबाईल, चैन चोरून नेण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
स्थानकात तगडा बंदोबस्त, तरीही चोरी
स्वारगेट आगारात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मात्र तरीही गुन्हेगार बिनधास्तपणे वावरत आहेत. पोलिसांचा कोणताही दरारा स्वारगेट परिसरात जाणवत नाही. बंदोबस्त असताना एसटी महामंडळातील एका वाहकाची बॅग चोरीला गेली आहे. त्यामध्ये ३० हजार रुपयांची रोख रक्कम होती. पैसे असलेली बॅग चोरीला गेल्यानं महिला कंडक्टर सध्या तणावात आहे. घटनेनंतर येथे मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. त्यांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पण याही परिस्थितीत चोरटे त्यांचा कार्यभाग साधत आहेत. साताऱ्याहून स्वारगेटला गाडी घेऊन आलेल्या सुप्रिया फाळके या महिला कंडक्टरची बॅग आगरातून चोरीला गेली.
गंजाडी, गांजा ओढणारे, दारूड्यांचा अड्डा
स्वारगेट परिसर तसेच बसस्थानकाच्या आवारात दारूडे, गांजा ओढणारे आणि पत्ते खेळणाऱ्यांचा अड्डा असल्याचे वास्तव आहे. याठिकाणी गांजा तसेच दारू पिणारे बसलेले असतात. आवारातच पाठिमागच्या साईडला हे तरूण बसून गांजा ओढत धूर सोडतात. तर दारूच्या पार्ट्या तसेच पत्ते देखील खेळले जात असल्याचे सांगितले जात आहे.
रिक्षा चालकाच्या आडून गुन्हेगारी
स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, संगमवाडी या भागात मोठ्या प्रमाणात रिक्षांची संख्या आहे. त्यातही पुणे स्टेशन व स्वारगेट भागात तर प्रवाशी रिक्षा, सहा आसनी रिक्षा असतात. रात्र देखील ही संख्या मोठी असते. दरम्यान, अनेकवेळा रिक्षा चालकांची भाषा गुंडासारखी, दमबाजी सारखी असते. त्यांच्याकडून मुद्दाम मिटरवर प्रवासी न घेता जादा पैशांची डिमांड केली जाते.
तेव्हा घेतली होती झाडाझडती…
चार वर्षांपुर्वी (२०२१) मध्ये पुणे स्टेशन येथून एका अल्पवयीन मुलीला घेऊन तिच्यावर सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. रिक्षा चालकांनी प्रथम तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. पोलिसांनी यानंतर शहरातील सर्वच रिक्षा चालकांची झाडाझडती घेतली होती. तेव्हा अनेक रिक्षा या चालविण्यासाठी भाड्याने दिल्याचे समोर आले होते. हे रिक्षा गुन्हेगार तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक चालवित असल्याचे समोर आले होते. तेव्हा त्यांना ड्रेसकोड, बिल्ला व इतर माहिती लावण्याचे आदेश दिले होते. नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थीच झाली आहे.
दाटीवाटीने बस लागलेल्या असतात.
स्वारगेट बसस्थानकात दिवसा प्रचंड गर्दी असते. गाड्यांची ये-जा देखील मोठी असते. तितकी नाही पण रात्री प्रवाशांची रेलचेल असते. मात्र, मुक्कामी असलेल्या बसची संख्या मोठी असते. त्या अगदीच दाटीवाटीने लावलेल्या असतात. बसचे दार उघडेच असतात. त्यामुळे आत जाऊन दारूडे झोपतात, तर कधी त्याठिकाणी लपतात देखील.
यापुर्वी घडलेल्या काही प्रातिनिधीक घटना…