संग्रहित फोटो
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. सुरुवातीला गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध असल्याप्रकरणी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील व्यक्ती असणाऱ्या समीर पाटील यांच्यावर निशाणा साधत समीर पाटील मार्फत निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटलांसोबत संपर्कात असल्याची टीका केली होती. याप्रकरणी आता समीर पाटील यांच्याबाबत माजी आमदार व शिवसेनेचे (शिंदे गट) महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आरोप करू नयेत, असे मनाई आदेश न्यायालयाने दिले आहेत.
रवींद्र धंगेकर यांनी आमदार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच समीर पाटील यांच्यावर नुकतेच आरोप केले होते. नंतर समीर पाटील यांनी धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला होता. पाटील यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघल यांच्या न्यायालायात सुनावणी झाली. पाटील यांच्याबाबत कोणतेही मानहानीकारक विधान, तसेच आरोप करू नयेत, असे आदेश न्यायालयाने धंगेकर यांना दिले आहेत.
कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळने बनावट कागदपत्रांचा वापर करुन पासपोर्ट मिळविले. त्यानंतर याप्रकरणात धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर कोथरूडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत आरोप केले होते. पाटील यांचे घायवळ याच्याशी संबंध असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर समीर पाटील यांनी धंगेकर यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला. पाटील यांच्या दाव्यावर अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतेही बदनामीकारक वक्तव्य किंवा टिप्पणी करण्याबाबत धंगेकरांना न्यायालयाने मनाई केली आहे.






