संग्रहित फोटो
पुणे : उच्चभ्रु व्यक्तींना सायबर चोरटे टार्गेट करत असून, एका आयटी अभियंता तरुणीला शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल सव्वा दोन कोटींना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी अवघ्या दीड महिन्यात या तरुणीकडून सव्वा दोन कोटी उकळले आहेत. पोलिस देखील याप्रकारानंतर शॉक झाले आहेत. दुसरीकडे सायबर गुन्हे दिवसागणीक वाढत असून, त्यात शिक्षीत तसेच ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे निरीक्षण आहे.
याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी ते ११ मार्च २०२६ या १ महिना १६ दिवसांच्या कालावधीत घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शेवाळवाडी भागात राहते. ती आयटी इंजिनिअर असून, एका नोठ्या कंपनीतून तिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी तरूणीशी संपर्क साधला. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष तिला दाखविले. तरुणीला एक अॅप डाउनलोड करायला लावून गुंतवणूक करायला सांगितले. सुरूवातीला तरुणीला अॅपमध्ये नफा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तिचा विश्वास वाढला. ती गुंतवणूक करत राहिली. मात्र, नंतर तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता सायबर चोरटे विविध कारणे देऊन टाळाटाळ करू लागले. तेव्हा या तरुणीला संशय आला. तिने माहिती घेतल्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दवकाते करत आहेत.
निवृत्त आयटी इंजिनिअरची 99 लाख 99 हजारांची फसवणूक
तरुणीप्रमाणेच एका निवृत्त आयटी इंजिनिअरला देखील सायबर चोरट्यांनी तब्बल ९९ लाख ९९ हजार रुपयांना गंडा घातला आहे. त्यांनाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल असे सांगून फसविले आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय आयटी इंजिनिअरने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.






