सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातून अवैधरित्या मद्य वाहतूक करून पुणे जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर छापा टाकून ३१ लाख ५६ हजार रुपयांचा मद्यसाठा आणि चार वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
‘रॉयल क्लासिक व्हिस्की’ची बेकायदेशीर वाहतूक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला पुणे-सोलापूर महामार्गावर बेकायदेशीर मद्य वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर, पाटस टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान सोलापूरहून पुण्याकडे जाणारे एक चारचाकी संशयित वाहन अडवण्यात आले. या वाहनात गोवा राज्य निर्मित ‘रॉयल क्लासिक व्हिस्की’चे ४३ बॉक्स (३०० बाटल्या) आढळून आले. एकूण ३१. ५६ लाखांचा मद्यसाठा आणि वाहन जप्त करण्यात आले असून, संतोष मारकड आणि वैभव तरंगे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातही चार ठिकाणी छापे
या कारवाईदरम्यान पुणे जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून एकूण ४,७७९ बुचेस, ८४ बॉक्स मद्य, चार चारचाकी वाहने आणि हॉटेल व घरांमधील अवैध साठा असा मिळून ३१,५६,४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या; राहत्या घरी गळफास घेऊन संपवलं जीवन
कारवाईत सहभागी अधिकारी
या कारवाईत अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक उत्तम शिंदे, पोलीस निरीक्षक विजय रोकडे, शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एम. व्ही. गाडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
इचलकरंजीत नशेसाठी वापरणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त
इचलकरंजी पोलीसांनी नशेची इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उदध्वस्त केली आहे. नशेसाठी वापरणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. संग्राम अशोकराव पाटील (वय २९ रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपाद नगर), सचिन सुनिल मांडवकर (वय २५ रा. यशवंत कॉलनी) आणि अभिषेक गोविंद भिसे (वय २५ रा. लालनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ५२ बाटल्या व ६० हजाराची रोकड, ३ मोबाईल व २ दुचाकी असा २ लाख ३६ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.