संग्रहित फोटो
पुणे : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने राहत्या खोलीत टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली होती. अशातच आता आणखी एका पोलीस कर्मचार्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलीस शिपायाची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने राहत्या खोलीत टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. स्वारगेट पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. स्वरूप मूळचा कोल्हापूरमधील होता. तो अविवाहित होता. शहर पोलिसांत पोलीस शिपाई म्हणून काही वर्षांपुर्वी भरती झाला होता. पोलीस मुख्यालयात तो ‘ए’ कंपनीत नेमणूकीला होता. तो मित्रासोबत स्वारगेट पोलिस वसाहतीत बिल्डींग क्रमांक सहामध्ये राहत होता. दरम्यान, तो खोलीवर असताना त्याने हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास घेतल्याचे दिसून आले. लागलीच याची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याजवळ सुसाईड नोट मिळालेली नाही. त्याचा मोबाईल जप्त केला आहे, असे खडक पोलिसांनी सांगितले.