संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवार पेठेतील एका सोसायटीत घुसून वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेल्या आठ बॅटऱ्या आणि रिक्षा जप्त केली आहे. सूरज नामदेव साठे (वय ३२, रा. दांडेकर पूल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी शुक्रवार पेठेतील आशीर्वाद अपार्टमेंटच्या तळमजल्यावरून बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. तांत्रिक तपासात चोरटा रिक्षातून बॅटरी घेऊन पसार झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा सिंहगड रस्ता येथे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे यांना मिळाली. नंतर सापळा लावून साठेला ताब्यात घेतले. चौकशीत सूरज साठे याने पत्नी, तसेच महिलेच्या मदतीने सोसायटीच्या आवारातून बॅटरी चोरून नेल्याची समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून ८ बॅटऱ्या आणि रिक्षा जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.
रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटले
दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षाचालकाला मारहाण करून लुटल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली आहे. मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. युवराज अंबालप्पा भिल्लव (वय २५, रा. धायरी) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. भिल्लव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.