संग्रहित फोटो
पुणे : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी कोंढवा आणि आंबेगाव पठार भागात भरदिवसा ३ फ्लॅट फोडून सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी बंद घरांची टेहळणी करून ही चोरी केल्याचा संशय आहे. दुपारी झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याप्रकरणी कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहिली घटना आंबेगाव पठार येथील जिजामाता चौकातील इमारतीत घडली आहे. ४ जुलै रोजी दुपारी दोन ते पावणेतीन यादरम्यान चोरट्यांनी गणेश आढाव यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, त्यांच्या पत्नीचे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरले. तसेच, त्या इमारतीत तळमजल्यावर राहणाऱ्या लक्ष्मी राठोड यांचे १० ग्रॅम वजनाचे झुमके असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगरमधील टेनटेन्स बिल्डिंगमध्ये ७ जुलैला घडली आहे. शोएब शेख यांच्या फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख मिळून २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हे सुद्धा वाचा : पुण्यात टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले अन्…
तीनही घटनांमधील आरोपी फरार
भरदुपारी झालेल्या या तीन घटनांमधील आरोपी अद्यापही फरार आहेत. या चोरट्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, भरदिवसा घरे फोडली जात असताना पोलिस यंत्रणा केवळ तक्रारी नोंदवण्यातच गुंतल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
घरफोड्यांपुढे पोलीस हतबल!
पुणे शहरातील घरफोड्यांपुढे पुणे पोलिसांची हतबलता लोटांगण घेऊ लागली असून, चोरटे पुढे अन् पोलिस मागे असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून असल्याचे पाहिला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांवर चोरटे डल्ला मारत असताना पोलिसांचे हात रिकामेच असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील किरकोळ स्वरूपातच आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात या घटना सलग घडत असून, पुन्हा एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. ज्यात लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. त्यामुळे पुणेकर भयभित आहेत.
वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करुन चोरी
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.