संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता शिरुर तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने गावातील एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा प्रदीप रणदिवे (वय ६०, रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) या आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर दुचाकी नेण्यासाठी डबर टाकून उंचवटा तयार करत होत्या. त्याचवेळी उपसरपंच संगीता शांताराम सावंत (रा. बिबे गावठाण, वढू बुद्रुक) या तेथे आल्या आणि त्यांनी प्रज्ञा रणदिवे यांना “येथे डबर टाकू नका” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
दरम्यान, प्रज्ञा रणदिवे या घरात गेल्यानंतर उपसरपंच सावंत यांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पुन्हा शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत प्रज्ञा रणदिवे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून उपसरपंच संगीता शांताराम सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे करत आहेत.
तासगावात मुलाने केला आईचा खून
एका तरुणाने दारुसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे. पोटच्या मुलानेच अशाप्रकारे जन्मदात्या आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शांताबाई चरण पवार (वय ७०) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांचा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) घरी आला. जगनला दारुचे व्यसन आहे. यावेळी जगन हा दारूच्या नशेत होता. रात्री उशिरा घरी आल्यानंतर जगन त्याच्या आईशी दारुसाठी पैसे देत नाही म्हणून वाद घालू लागला. पैशावरुन तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने आई शांताबाई यांना धक्का दिला. त्या खाली जमिनीवर कोसळल्या. यावेळी संतापाच्या भरात जगनने घरात असलेली तलवार काढली आणि जमिनीवर पडलेल्या आईला तलवारीने भोसकले. भोसकल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.