संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, चोरटे दररोज नागरिकांना टार्गेट करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे पुणे–नगर महामार्गावर सहलीसाठी निघालेल्या डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
अहिल्यानगर येथील डॉ. चंद्रसेन चौधरी, डॉ. प्रकाश मरकड, शिवाजी भापकर, सुधीर तांबे आणि राजवीर संधू हे एमएच १६ डीएम ६४७८ या चारचाकी वाहनाने कोकणात सहलीसाठी निघाले होते. हे पथक अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना, पाऊस सुरू झाल्याने त्यांनी कोंढापुरी येथील एका हॉटेलसमोर कार थांबवून काच पुसत असताना ही घटना घडली.
दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरांना मारहाण केली. त्यातील एकाने डॉ. प्रकाश मरकड यांच्या पोटाला कोयता लावून “तुमच्याकडे जे काही आहे ते द्या” असे धमकावले. चोरट्यांनी पाचही डॉक्टरांना मारहाण करून त्यांच्या हातातील अंगठ्या व रोख रक्कम हिसकावली. दरम्यान, चोरटे डॉ. चंद्रसेन चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी प्रतिकार केला. यावेळी एका चोरट्याने त्यांच्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले आणि गळ्यातील चैन हिसकावून घेतली.
चोरट्यांनी या पाचही डॉक्टरांकडून सुमारे सव्वा तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख २० हजार रुपये असा ऐवज लुटून दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर डॉ. चंद्रसेन सुभाषराव चौधरी (वय ४६, रा. एमएसईबी कॉलनी, माणिकनगर, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर पुणे–नगर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी वाढत्या लुटमारीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






