संग्रहित फोटो
पुणे : पुणेकरांना मदत अन् पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या ‘कॉप्स २४’च्या दोन पोलिसांनाच रात्र गस्तीवर असताना दुचाकीस्वार टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेशिस्त गाडी चालविताना दुचाकीस्वार चालकाला अडविल्यानंतर चौघांनी त्यांना मारहाण केली आहे. अक्षरश: रस्त्यावर खाली पाडून ही मारहाण केली गेली आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे.
गोपाल देवसिंग गोठवाल (वय २८) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुनैद इक्बाल शेख (वय २७), नफीज नौशाद शेख (वय २५), युनुस युसूफ शेख (वय २५) व आरिफ अक्रम शेख (वय २५, सर्व. रा. भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(१), ३५२,२८१,३(५), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोपाल गोठवाल हे पोलिस शिपाई असून, त्यांची पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या कॉप्स २४ मध्ये नियुक्ती आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या अंतर्गत खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग व गस्त घालतात. दरम्यान, गुरूवारी रात्री पाऊणे नऊच्या सुमारास गोपाल व काजळे हे जुना पुणे-मुंबई रस्त्यावरील चर्च चौक येथे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा जुनैद व नफीज हे बेशिस्तरित्या दुचाकी चालवत जात होते. त्यामुळे त्यांनी दोघांना अडवले आणि गाडी ऐवढ्या वेगात का चालवता, अशी विचारणा केली. तेव्हा जुनैद याने त्यांना अश्लील शिवीगाळ करत ‘तु कोण मला विचारणारा’, असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला.
त्याचवेळी पाठिमागून त्यांचे दोन साथीदार दुसऱ्या दुचाकीवर तेथे आले. नंतर त्यांनी पोलिस शिपाई गोपाल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना रस्त्यावर पाडून लाथा-बुक्यांनी छातीत, पोटात व पाठित आणि डोक्यात बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबतच काजळे यांनाही या टोळक्याने बेदम मारहाण केली. नंतर हे टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारहाणीत जखमी झालेल्या गोपाल यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखलकरून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला. काही वेळातच या चौघांना पोलिसांनी पकडले. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.