संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सतत नागरिकांना आवाहन केले जात आहे मात्र घटना कमी होताना दिसत नाही. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोथरूड भागातील महिलेला सायबर चोरट्यानी एपीके फाईल पाठवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आनाेळखी क्रमांकावरुन पाठवलेली एपीके फाईल त्यांनी उघडली. त्यानंतर त्यांची फसवणूक केली.
अशाच पद्धतीने सिंहगड रस्ता भागातील एकाची देखील सायबर चोरट्यांनी फसवणूक केली होती. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका मोबाइल वापरकर्त्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. त्या गृहिणी आहेत. ५ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्या घरात होत्या. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविण्यात आली. एपीके फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांचा मोबाइल क्रमांकातील गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन तक्रारदार महिलेच्या दोन बँक खात्यांमधून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख रुपये लांबविले.
बँक खात्यामधून पैसे परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत. अनोळखी क्रमांकावरून पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडू नका. दिवाळीत शुभेच्छा संदेश पाठविण्यात येतात. अनोळखी क्रमांकावरुन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आलेला संदेश उघडल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.