संग्रहित फोटो
बार्शी : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कारणावरुन कोणी ना कोणी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता बार्शी तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणानेे स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील खडकलगाव येथे ही घटना घडली आहे.
सोमनाथ सुरेश रोंगे (वय ३५, रा. खडकलगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) असे मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयताचे वडील सुरेश रंगनाथ रोंगे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गावातीलच ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे हिने वेळोवेळी सोमनाथ रोंगे याला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला पैसे आणून देत जा, माझ्याकडे नेहमी येत जा, तू जर मला सोडून गेलास तर तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देते, असे म्हणून त्याच्याशी नेहमी वारंवार भांडण करून त्याला मानसिक त्रास दिला, ज्योती हिने सोमनाथ याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे अधिक तपास करत आहेत.
कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या
सततचा मानसिक त्रास, गावात होणारी बदनामी आणि लग्नात होणारा अडथळा या त्रासास कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रांती श्रीकांत कांबळे (वय २४) (केनवडे, ता. कागल) असे मृत तरुणीचे नाव आहे, ही घटना ५ ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल बाजीराव पाटील (वय ३२) (रा. केनवडे ता कागल) याला कागल पोलिसांनी अटक केली आहे. केनवडे गावातीलच संशयित अमोल पाटील हा सन २०२३ ते २०२५ या काळात पूर्वीचे प्रेम संबंध असल्याचे सांगून मृत शुक्रांतीचा पाठलाग करत असे. सतत घराभोवती आणि घरासमोरून फेऱ्या मारणे, शिट्ट्या मारणे, हातवारे करून फोन करण्याचा इशारा करणे, ठरत असणाऱ्या लग्नाची स्थळे मोडणे, याबाबत नातेवाईकांच्या मध्ये बदनामी करून मानसिक त्रास देणे. या सर्व त्रासाला शुक्रांती कंटाळलेली होती. त्यामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने सतत होणाऱ्या मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर शुक्रांतीने पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातच विषारी तणनाशक प्राशन केले.