सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, फुरसुंगी परिसरात चोरट्यांनी कुलूप बंद असलेले बार अँड रेस्टाँरट फोडून दारूच्या बाटल्या अन् रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. यासोबतच लोणीकंदमध्ये बंद फ्लॅट फोडण्यात आला असून, या दोन घटनांमध्ये साडे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात रमेश वैद्य (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे सासवड रस्त्यावरील गणेशनगर परिसरात वैद्य यांचे रेस्टाँरट अँड बार आहे. दरम्यान, रविवारी नेहमी प्रमाणे बार बंदकरून रात्री ११ वाजता त्याला कुलूप गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, आतमधील दारूच्या बाटल्या आणि रोकड असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तक्रारदारांना हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आकराच्या सुमारास लक्षात आला. नंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे.
दुसऱ्या घटनेत लोणीकंद येथील वढू खुर्द येथील बंद घर फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी कपाटातून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात वंदना एडके यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात चर्चांना उधाण
पुण्यात चोरीचे प्रमाण वाढले
पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.