संग्रहित फोटो
पिसर्वे : पिसर्वे आणि परिसरातील नागरिकांना “आला हिवाळा तिजोऱ्या सांभाळा! “असे म्हणण्याची वेळ आली आहे. पिसर्वे परिसरातील धाडसी चोऱ्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेईना झाले. मागील १८ दिवसात चोरट्यांनी पिसर्वे व मावडी सुपे परिसरातील तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी पिसर्वे येथील एका ठिकाणी त्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला तर पिसर्वे व मावडी सुपे या दोन ठिकाणी मात्र त्यांनी यशस्वीरित्या तब्बल २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. त्यामुळे चोरांनी आता जेजुरी पोलिसांनाच नव्हे तर येथील कायदा सुव्यवस्थेलासुद्धा आव्हान दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी पिसर्वे मावडी- सुपे रस्त्या लगत असलेल्या दत्तात्रय भगवान देवकर यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचा कोयंडा भर दुपारी अडीच ते पाच वाजण्याच्या दरम्यान तोडून तब्बल १५ तोळे सोने, चांदीचे काही दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार देवकर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान सदर घटनेची माहिती मावडीच्या पोलीस पाटील उज्वला कोलते यांनी जेजुरी पोलीस ठाण्यास कळविल्यानंतर जेजुरी पोलिसांनी तत्काळ भेट देवून पाहणी केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच शनिवारी ठसे तज्ञानी घटनास्थळी भेट दिली. कपाटावरील संशयितांच्या हाताच्या ठश्यांचे नमुने घेतल्याची माहिती जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी दिली.
पिसर्वे व मावडी सुपे येथील तीनही चोऱ्यांचा प्रयत्न आठ ते दहा दिवसांच्या अंतराने झालेला आहे. चोरांनी लक्ष केलेली तीनही घरे रस्त्या कडेला एकांती व शेत वस्तीवरील होती. यातील पहिली चोरी १७ डिसेंबर २०२४ ला पिसर्वे येथील विजय जगन्नाथ कोलते यांच्या घरी रात्री ११ वाजता झाली. यामध्ये जवळपास दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल आहे. मात्र त्याचा तपास अजूनही सुरूच आहे. दुसरा फसलेला चोरीचा प्रयत्न २७ डिसेंबर २०२४ ला घडला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पहिल्या घटनास्थळापासून काही अंतरावरील तानाजी वसंत कोलते यांच्या घरी घडला. मात्र घरातील त्याच्या मुलीच्या व पत्नीच्या सावधगिरीमुळे चोरीचा तो प्रयत्न फसला. तिसरा प्रकार ३ जानेवारी २०२५ मावडी सुपे येथील दत्तात्रय भगवान देवकर यांच्या घरी भर दुपारी अडीच ते पाच वाजण्याच्या सुमारास घडला. पिसर्वे परिसरात चोरांनी घातलेला धुमाकुळाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी जागरूक राहणे अत्यावश्यक : वाकचौरे
मागील काही दिवसांपासून पिसर्वे परिसरात मोठ्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्र गस्ती साठी पोलीस फिरत आहेतच. परंतु आता गावाकऱ्यांनी देखील जागरूक राहणे अत्यावश्यक बनले आहे. दागिणे व मोठ्या रकमा घरात न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवल्यास सुरक्षित राहतील. त्याचबरोबर गावातील बंद अवस्थेमधील ग्राम रक्षक दल आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा पुन्हा नव्याने कार्यान्वित कराव्यात. याबाबत सर्व ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार झालेला असताना सुद्धा ग्रामपंचायती त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने तातडीच्या वेळी मदत उपलब्ध करून देणे अवघड होत असल्याचे मत जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी व्यक्त केले.
लॉकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू : सचिन दोलताडे
बँक ऑफ इंडियाच्या पिसर्वे शाखेकडे उपलब्ध असलेले सर्व लॉकर अगोदरच ग्राहकांनी बुक केले असल्याने आता एकही लॉकर उपलब्ध नाही. सध्या पिसर्वे आणि परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने बँकेचे ग्राहक लॉकर संदर्भात चौकशी करत आहेत. मात्र जास्त ग्राहकांची मागणी वाढली तर बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून नवीन लॉकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करता येतील. मात्र त्यासाठी या शाखेत मोठ्या स्ट्रॉंगरूमची गरज असल्याचे मत बँक ऑफ इंडियाचे पिसर्वे शाखा व्यवस्थापक सचिन दोलताडे यांनी व्यक्त केले.