संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफ बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिरनजीत अंबिका बाग (वय २३, सध्या रा. दगडी नागाेबा मंदिराजवळ, रविवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, चिरनजीत हा एका दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला आहे. सराफ बाजारातील सराफांनी सोने दिल्यानंतर त्यांना दागिने घडवून दिले जातात. गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास तो रविवार पेठेतून निघाला होता. त्याच्याकडे १९ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने होते. दागिने त्याने पिशवीत ठेवले होते. मोती चौकातील पदपथावरुन तो निघाला होता. पुष्पम ज्वेलर्ससमोर दोघांनी त्याला अडवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी त्याला बोलण्यात गुंतविले. त्याचे लक्ष नसल्याची संघी साधून दागिने असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले.
चरणजितने आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोन्या मारुती चौक, मोती चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे अधिक तपास करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.