File Photo : Crime
नागपूर : लग्नासाठी गळ घालणाऱ्या एका माथेफिरू युवकाने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. हा संतापजनक प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला.
हेदेखील वाचा : ‘भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारांत वाढ’; संजय राऊत यांचा घणाघात
नागेश चाफले (वय 26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी दहाव्या वर्गात शिकत असून अभ्यासात हुशार आहे. आई-वडील आणि लहान भावासोबत ती राहते. आरोपी नागेश हा कचऱ्याच्या गाडीवर काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून तो पीडितेचा शाळेत येता-जाताना पाठलाग करत होता. 22 ऑगस्ट रोजी पीडिता नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास ती शाळेतून मैत्रिणीसह मेट्रोने न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर उतरली.
स्टेशनमधून बाहेर पडताच आरोपी नागेशने तिला अडवून गैरवर्तन केले. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे तो संतापला आणि त्याने पीडितेला अॅसिडने चेहरा विद्रूप करण्यासह तिच्या वडिलांनाही ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरली. याच दरम्यान आरोपी नागेशने हात पकडून पीडितेला स्वतःकडे ओढत अश्लील चाळे केले.
शिवीगाळ करत लगावली कानशिलात
पीडितेने विरोध करत सुटका करून घेतली. त्यामुळे नागेशने चिडून तिला शिवीगाळ करत कानशिलात लगावली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा शोध घेत शनिवारी त्याला अटक केली.
हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना