फोटो सौजन्य: I Stock
मीरा रोड : मीरा रोडच्या विनय नगर येथील JP नॉर्थ बार्सिलोना या उच्चभ्रू सोसायटीत रविवारी सकाळी 6.30 वाजता एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीत प्रवेश नाकारल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला आणि मद्यधुंध अवस्थेत लोकांवर कार चढवली. या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील 3 सिक्योरिटी गार्ड्सना गंभीर दुखापत झाली आहे.
सकाळी आरोपी कशिश गुप्ता आणि अक्षित गुप्ता हे दोघेही एका गाडीतून सोसायटीत येऊन पोहोचले. मात्र, त्यांची गाडी सोसायटीच्या नोंदणीकृत यादीत नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. यावरून आरोपी संतापले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी बंदूक दाखवत सुरक्षा रक्षकांना धमकावले.त्यानंतर, संतप्त आरोपींनी मद्यधुंध अवस्थेत सोसायटीतील लोकांवर कार घालून तुफान धडक दिली. यामध्ये 8 जण जखमी झाले, त्यापैकी तीन सिक्योरिटी गार्ड्स गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार:
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरक्षारक्षकांना धमकावत “गाझियाबादची झांकी दाखवतो” असे सांगितले आणि काही क्षणांतच त्यांनी गाडी वेगाने सोसायटीत घुसवली. या संपूर्ण प्रकरणाचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांची कारवाई:
घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात हे दोघेही मद्यधुंध असल्याचे आढळले आहे.
परिसरात भीतीचे वातावरण:
या धक्कादायक घटनेमुळे सोसायटीतील रहिवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रहिवाशांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.