संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठ नागरिकाकडील ७५ हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार दुचाकीने सोमवारी (१७ फेब्रुवारी) वाघोली-लोहगाव रस्त्याने जात होते. संतनगर येथे चोरट्यांनी दुचाकीस्वार ज्येष्ठाला अडवले व पोलीस असल्याची बतावणी केली. चोरट्यांनी त्यांना दुचाकीची डिक्की उघडण्यास सांगितले. ‘या भागात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. वाहनांची तपासणी सुरू आहे. तुमच्याकडील सोनसाखळी दुचाकीच्या डिक्कीत ठेवा’, असे चोरट्यांनी सांगितले. चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून डिक्कीतील सोनसाखळी चोरुन चोरटे पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर करत आहेत.
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.