File Photo : Crime
वैजापूर : बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण गाजत आहे. असे असतानाच शहरालगतच्या महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून फोटो व्हायरल करून धमकी देण्यात आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : दौंड हादरलं ! शिक्षकाने केला विद्यार्थीनींवर अत्याचार; 2 जणांवर गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अल्पवयीन मुलगी अकरावीत शिक्षण घेत असून, ती 19 ऑगस्ट रोजी शहरालगतच्या महाविद्यालयात गेली होती. याच महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलांनी तिला गाठून यातील एकाने ‘मागील वेळेस तुझे व्हिडिओ व्हायरल केले ते कमी होते का? यावेळी तुझा शेवट करुन दाखवू’ अशी धमकी दिली. त्यामुळे ती घाबरली.
दरम्यान, महाविद्यालयातील कॅन्टिनजवळ मैत्रिणींकडे नोट्स घेण्यासाठी गेली असता त्या दोघांनी तिचा पाठलाग करून पुन्हा धमकावले. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून या मुलीने पोलिसांता तक्रार दिली असून, या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उडवाउडवीची उत्तरे..
या मुलीने घडला प्रकार घरातील सदस्यांना सांगितला. त्यानंतर सदस्यांनी महाविद्यालयात जाऊन त्या मुलांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. यातील एकाचा मोबाईल तपासला असता त्याने मुलीचे ओळखपत्र व्हॉटस्अॅपवरून पाठविल्याचे दिसून आले.
मोबाईलमध्ये आढळले मुलीचे आक्षेपार्ह फोटो
तत्पूर्वी मुलीचे तालुक्यातील वीरगाव येथील एका मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ असल्याचे घरातील सदस्यांना त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले. त्यावेळीही मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली होती. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : ‘एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो’; राज ठाकरे यांचं विधान