संग्रहित फोटो
पुणे : शिरूर उपविभागीय कार्यालयातील एका लिपीक महिलेसह दोघांना टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिरुर उपविभागीय कार्यालयातील लिपिक सुजाता मनोहर बडदे तसेच खासगी व्यक्ती तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर बंडगार्डन पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गु्न्हा दाखल केला आहे.
राज्य शासनानाने यातील तक्रारदार यांच्या जमिनीचे टेमघर प्रकल्पासाठी अधिग्रहन केली होती. शासनाकडून त्यांना शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडीत जागा देण्यात येणार होती. शेतजमीन आणि घरासाठी दोन गुंठ्यांचा भूखंड शासनाकडून त्यांना मंजूर झाला होता. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे प्रस्ताव शिरुर उपविभागीय कार्यालायातील लिपिक सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते. शिरुर उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी प्रत्येक प्रस्तावापोटी ५० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. बडदे यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून चार लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीतअंती प्रत्येक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितली. आठ प्रस्ताव मंजूरीसाठी तीन लाख २० हजार रुपये देण्याची मागणी केली होती.
लाचेच्या पहिला हप्त्यापोटी १ लाख ६० हजार रुपयांची लाच घेऊन तक्रारदाराला शिरुर उपविभागीय कार्यालायात बोलाविले. बडदे यांच्या सांगण्यावरुन ही रक्कम खासगी व्यक्ती तानाजी मारणे याच्याकडे दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मारणेला लाच घेताना पकडले. चौकशीत बडदे यांच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे उघड झाल्यानंतर दोघांवर रात्री उशीरा बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातून महिलेचे दागिने हिसकावले
पाच हजारांची लाच घेताना पकडले
राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय 42, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.