कारच्या चाकातील हवा कमी असल्याचा चोरट्यांनी बहाणा केला अन् रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला
नारायणगाव : नारायणगाव येथील एका बँकेत पैसे डिपॉझिट करून घरी निघालेल्या अजित अशोकराव कोल्हे (सध्या रा., सूस, पुणे) या कारचालकाला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ‘तुमच्या गाडीची हवा कमी आहे’, असे सांगून गाडीतील बॅग घेऊन दुचाकीवरील दोघांनी सिनेस्टाईल चोरी केल्याचा प्रकार नारायणगाव येथे मंगळवारी (दि.15) दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडला.
या घटनेनंतर लगेच कारमध्ये हवा भरण्यासाठी अजित कोल्हे व त्यांची आई शशिकला कोल्हे येथील गोविंद प्लाझा इमारतीसमोर कोराळे सर्व्हिस स्टेशन येथे आले. तेव्हा तेथे दोन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी कोल्हे यांच्या मागच्या सीटवर असलेली कार्यालयीन कामकाजाची बॅग पळवून नेली. या बॅगेत त्यांनी बँकेची कागदपत्रे व पैशाचे पाकीट ठेवले होते. ही घटना आशिष वसंत खैरे उर्फ टम्या यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर लगेचच या चोरट्यांचा पाठलाग अभिजीत कोराळे व त्यांच्या मित्राने केला. मात्र, चोरटे वेगात गेल्याने ते पसार होण्यास यशस्वी झाले.
हेदेखील वाचा : Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; अकरा आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल
दरम्यान, घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरीचा तपास करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत स्वतः अजित कोल्हे यांनी घडलेली सांगितली. बँकेत काही रक्कम डिपॉझिट करण्यासाठी गेलो होतो, तेथून परत जात असताना अज्ञात दोघे जणांनी तुमच्या गाडीच्या टायरची हवा कमी आहे, असे सांगून आमचा पाठलाग केला.
महत्त्वाची कागदपत्रे गेली चोरीला
आम्ही हवा चेक करण्यासाठी गेल्यानंतर आमचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी आमच्या कारमधील माझे पाकीट असलेली बॅग पळूवून नेली. यामध्ये माझी बँकेची कागदपत्रे आणि पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरटे घेऊन गेले त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये तक्रार दिली.
आनंदनगरला दोन फ्लॅट फोडले
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरातील एकाच इमारतीमधील दोन बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. चोरट्यांनी या दोन्ही फ्लॅटमधून ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. रविवारी दुपारीच हा प्रकार घडला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.