पैशांच्या वादातून मित्राने केली हत्या
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. उसने दिलेल्या पैशांच्या वादातून गुन्हेगारीत सक्रिय दोन भावंडांनी मित्रासोबत मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. पैसे परत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्या तरुणाला भेटायला बोलावले आणि तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून त्याचा खून केला. ही घटना रविवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत लकडापूलजवळ घडली.
राहुल मोहन पांडे (वय 24, रा. भूतेश्वरनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. रोहित उर्फ मारी नामदेव चांदेकर (वय 29) आणि विक्की नामदेव चांदेकर (वय 33) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. परिसरातच राहणारा त्यांचा साथीदार नीरज लारोकर हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मृतक राहुलची रोहितशी मैत्री होती. काही दिवसांपूर्वी राहुलने रोहितला 8 हजार रुपये उसने दिले होते. पैसे परत मागण्यावरून राहुल आणि रोहित यांच्यात अनेकदा वाद सुद्धा झाला होता.
हेदेखील वाचा : बीड हादरलं! लग्नाचं आमिष दाखवत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार, ५ महिण्याची गर्भवती…
दरम्यान, रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास रोहितने राहुलला फोन केला. त्याला पैसे घेण्यासाठी लकडापूलजवळ बोलावले. राहुल तेथे गेला असता रोहितसोबत विक्की आणि नीरजही होते. राहुलने पैशांची मागणी केली असता आरोपीने वाद घातला. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. तिन्ही आरोपींनी मिळून राहुलला जबर मारहाण सुरू केली. त्याच दरम्यान रोहितने चाकू काढून राहुलवर हल्ला केला. सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. राहुलला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दोन आरोपींना अटक; एक आरोपी फरार
पोलिसांनी राहुलची आई सुनीता पांडेच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी चांदेकर बंधूंना अटक केली. नीरज फरार आहे. रोहित आणि विक्कीला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा : कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत…