वसई/ रविंद्र माने: दिवसेंदिवस वसई विरार परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत जात आहे. नुकतच वसई शहरात अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मॅफेड्रोन हा घातक अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना नालासोपारात सुरु असल्याची धक्कादायक महिती उजेडात आली असून,एका नायजेरियन महिलेच्या अंगझडतीत तब्बल साडेपाच कोटींहून अधिक रुपयांचे अंमली पदार्थ सापडल्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत.
नालासोपारा पुर्वेकडील प्रगतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे. या नगरात त्यांनी बेकायदा बार,दारुचे अड्डे आणि अमली पदार्थांचे रॅकेट उभारले आहे.त्यातून अनेकदा हाणामाऱ्या आणि खूनसारख्या घटना घडल्यामुळे येथील रहिवाशांनी त्यांचा धसका घेतला आहे. पोलासांनीही वारंवार कारवाई करुन कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतरही नायजेरियन नागरिकांकडे पुन्हा कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ सापडत असल्यामुळे ते कुठून आणि कसे आणले जातात,असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,या प्रश्नाचे कोडे आता उलगडले आहे.
प्रगतीनगरातच मॅफेड्राॅन तयार केले जात असल्याचे तुळींज पोलीसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.प्रगतीनगरात एक विदेशी महिला बेकायदा वास्तव्य करुन हे अमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरिक्षक राहूल फड यांना मिळाली होती.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फड यांनी अंशित प्लाझा,प्रगतीनगर नालासोपारा पूर्व येथे राहणाऱ्या रिटा फटी कुरेबीवीई ( मुळ देश घाणा ) हिला ताब्यात घेवून महिला पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,तीच्या कब्जात ५ कोटी,६० लाख,४२ हजार,४५० रुपये किमतीचे एम.डी. (मॅफेड्रॉन) सापडले.
तसेच तिच्या राहत्या घरात एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य ही सापडले.त्यामुळे एमडी प्रगतीनगरातच तयार केला जात असून,तिथून तो अन्यत्र पाठवला जात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.सदर महीले विरुध्द तुळींज पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २१, २१ (क), २२,२९ सह विदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर, बाळासाहेब बनकर,उपनिरिक्षक राहुल फड,महिला पोलीस उपनिरिक्षक रोहिणी डोके,सहाय्यक फौजदार शिवानंद सुतनासे,हवालदार उमेश वरठा, आशपाक जमादार,राहुल साळुंखे,सचिन कांबळे,राहुल कदम,आजिनाथ गिते,प्रसाद पालवे,शितल सानप,पुजा अहिरे यांनी ही कामगिरी केली.