सौजन्य - नवराष्ट्र टीम
जेजुरी : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळार्जून गावच्या नदी पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याची भट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात आले, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळार्जून गावच्या हद्दीत सालोबा मळ्यात नदीच्या पात्रात झुडपात बेकायदेशीररित्या गावठी दारूभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी या दारुभट्टीवर छापा टाकला. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी पातेले,१३ हजार लिटर कच्चे रसायन, ५२५ लिटर तयार दारू,प्लास्टिक कांड, सरपन आदी साहित्य जप्त केले.
‘जेसीबी’च्या साह्याने सर्व साहित्य जागीचं नष्ट करण्यात आले. पोलिसांनी संशयित नशीब कचू राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करून अनेक दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाई बद्दल जेजुरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.