(फोटो सौजन्य - Social Media)
पेण (विजय मोकल) : पेण तालुक्यातील तांबडी गावातील वरवणे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या खुशबू ठाकरे या नऊ वर्षांच्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू चुकीच्या औषधांमुळे झाला की काविळने? याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. १६ डिसेंबर रोजी या आश्रमशाळेत कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसूम अभियानांतर्गत आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी शिबीर घेतले होते. या शिबिरात २१ मुले संशयित आढळली. त्यामध्ये खुशबूला कुष्ठरोगाचे निदान झाले. १८ डिसेंबरपासून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र ३ जानेवारी रोजी तिला ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली येथे नेण्यात आले. तपासणीनंतर तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि काविळ होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले.
तिला पुन्हा ताप आल्यावर १० जानेवारीला उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर पेण येथील अंकुर हॉस्पिटल आणि नंतर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी कुष्ठरोगावरील औषधे बंद करण्यात आली. मात्र, उपचार सुरू असतानाच २२ जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला. खुशबूच्या वडिलांचा आरोप आहे की, त्यांच्या मुलीला चुकीचे निदान करून कुष्ठरोगी घोषित करण्यात आले आणि चुकीच्या औषधांमुळेच तिच्या अंगावर सूज आली व यकृतावर परिणाम झाला. त्यांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुख्याध्यापक अजित पवार यांनी वरवणे आश्रमशाळेत आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, औषधोपचार प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार पार पडली. तसेच कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नेत्रा पाटील यांनीही औषधोपचार योग्य पद्धतीने झाल्याचा दावा करत विद्यार्थिनीला दिलेल्या औषधांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले.
परंतु या प्रकरणाला तब्बल बारा ते चौदा दिवस झाले असूनही अद्याप संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्यावर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खुशबूच्या मृत्यूचे खरे कारण तिच्या पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल, परंतु या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणीही होत आहे.