पत्नीने केला पतीचा खून (फोटो - istock)
सेनगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. गोरेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. किरकोळ वाद विकोपाला गेला आणि हत्येसारखी घटना घडल्याची माहिती दिली जात आहे.
कैलास गलंडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुमित्रा असे आरोपी महिलेचे नाव आहे. बाभुळगाव येथे दोघेही पती-पत्नी दोन मुलांसह राहत होते. त्यांचा एक मुलगा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. सोमवारी रात्री कैलास व सुमित्रा यांचा वाद झाला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास वाद विकोपाला गेला. या वादात कैलास हे हत्यार घेऊन सुमित्राच्या अंगावर गेले. मात्र, यावेळी सुमित्रा हिने तेच हत्यार पती कैलास यांच्या डोक्यात मारले. या हत्याराचा घाव वर्मी लागल्यामुळे कैलास यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आपल्या हातून पतीचा खून झाल्याचे लक्षात येताच सुमित्रा घाबरली. तिने दुचाकी वाहनातील पेट्रोल काढून कैलास यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्यांनी दारुच्या नशेत पेटवून घेतल्याचा बनाव केला.
डोक्यात मारल्याने जखमा
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. यावेळी पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केला असता मयत कैलास यांच्या डोक्यात मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. पोलिसांनी या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शस्त्राने वार केला असावा, असे सांगितले,
मुलाच्या तक्रारीवरून आईविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी कैलास यांच्या पत्नीनेच खून केल्याची शक्यता गृहीत धरून चौकशी सुरु केली. यामध्ये रात्री उशिरा कैलास यांचा मुलगा गणेश गलंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात सुभित्रा गलंडे हिच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे गोरेगाव पोलिसांनी सांगितले.