Photo Credit- Social Media नागपूर हिंंसाचार 'नियोजनबद्ध कट'; पोलीस तपासात मोठी माहिती उघड
नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. सोमवारी (17 मार्च) नागपूरमध्ये सायंकाळी साडेसातच्या दरम्यान, दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला. महाल परिसरात या वादावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाली. या झटापटीत अनेकजण जखमी झाले. तर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या हिंसाचारादरम्यान नागपुरात जमावाकडून एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. भालदारपूर भागात घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे नागपूरसह राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी संध्याकाळी नागपुरात झालेल्या दगडफेकीनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर विविध भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्याच दरम्यान, भालदारपुरा परिसरातील एका गल्लीत दंगा नियंत्रण पथकातील महिला पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना हा संतापजनक प्रकार घडला.
दंगेखोरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना, अंधाराचा फायदा घेत जमावातील काही समाजकंटकांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.इतकेच नव्हे तर, महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळही करण्यात आली. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली, तर तब्बल अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 46 जणांना अटक केली असून, त्यापैकी 36 आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच, सहा आरोपींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकारावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “नितेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार?
विधानसभेत लाडक्या बहिणीची ढाल केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मढी उकराताहेत? विकासाचं गाठोडं काय अरबी समुद्रात बुडवलं का?” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.