पुण्याच्या यवतमध्ये जोरदार राडा (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने यवतमध्ये जोरदार राडा झाला आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट आमने -सामने आले आहेत. पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी हा राडा झाला आहे. यवतमध्ये राडा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यवतमध्ये दोन्ही गटाकडून जाळपोळ करण्यात आलेली आहे.
एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे पुण्याच्या यवतमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पोस्टमुळे यवतमध्ये दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तेथील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. काही दुचाकी पेटविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल काय म्हणाले?
साधारणपणे गेले तीन ते चार दिवस सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी आम्ही आवाहन करत होतो. आजही मी तेच आवाहन करेन. जे चुकीचे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. लोकांनी संयमाने घ्यावे असे आवाहन करतो. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.
यवतमध्ये नेमके घडले काय?
काही दिवसांवपूर्वी यवतमध्ये एका मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज यवतमध्ये एका सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट आमने-सामने आले. अनेक दुचाकी पेटवून देण्यात आल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?
छत्रपती शिवाजी महाराज हे या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मियांचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सर्व लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्रित येऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. मग त्या अस्मितेवर घाला घालायचा. ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
वेगवेगळे ग्रुप करून गावाच्या विविध भागात जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिसांच्या पहिल्या तुकडीने तिथे कारवाई करण्यास सुरुवात केली. पंधरा-वीस मिनिटांमध्ये आमची कुमक त्या ठिकाणी दाखल झाली. सध्या गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये. शांतता आहे. आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे.
– संदीप गिल,
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण