बीड: बीडच्या अंबाजोगाईत शहरालगत असलेल्या मगरवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापाऱ्यांवर लोखंडी कत्तीनं वार करत हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मगरवाडी येथे गोपाल जाधव हे आपल्या दुकानाबाहेर बसले असताना जयपाल अशोक माने व त्याचा साथिदार निशांत विष्णू जागीर या दोघांनी हा हल्ला केला. यावेळी माने याने कपड्यात लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव याच्यावर हल्ला केला. डावा हात पुढे केल्याने या हल्ल्यात ते बचावले मात्र जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जाधव यांनी कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला.
यावेळी दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही,” अशी यावेळी धमकी दिली. जाधव याने गावातील मित्राच्या घरी आश्रय घेत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठल्याने त्याचे प्राण वाचले. जखमी जाधव याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल?
या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान,आरोपी जयपाल माने यासही सायंकाळी काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना काल शुक्रवारी घडली. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बेडसकर याने एका महिलेसह एका सोळा वर्षाच्या मुलीला गाडीमध्ये बसवून नेत एका शेतामध्ये या मुलीचा विनयभंग केला. त्या ठिकाणी काही इतर लोक येताच बेडसकर याने तिथून पळ काढला. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या केज पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.