प्रचारसभेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्यासभा वाढल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान कर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसे पक्ष देखील ताकदीने उतरला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोशी मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे. तसेच पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यामुळे टोला देखील लगावला आहे. तसेच निवडणुकींच्या प्रचारसभांचा कंटाळा आला असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. निवडणूक सभांचा प्रचार करणं कंटाळवाणं असतं. आता टीव्हीवर लाइव्हही दाखवतात. तेच तेच बोलावं लागतं. किती गोष्टी तुम्ही ऐकल्या मला माहीत नाही. पण तेच तेच विषय बोलावे लागतात, असे मत राज ठाकरे यांनी वक्त केले.
हे देखील वाचा : सलग 11 वेळा विजयाचा रेकॉर्ड; पण यावेळी ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार
पुढे राज ठाकरे यांनी राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, “मागच्या पाच वर्षांतला सगळा गोंधळ तुम्ही पाहिला आहे ना. काय गोष्टी घडल्या? कोण कुणाबरोबर गेलं? तुम्हाला माहीत आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज एकनाथ शिंदेंकडे गेली. निवडणूक चिन्हासकट ती गेली. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यात एक घोषणा होती. बाण हवा की खान? दुर्दैव असं की उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय. उरलेत फक्त खान. वर्सोव्यात उमेदवार कोण दिलाय? हारुन खान. हा शिवसेनेचा उमेदवार आहे. ज्याच्या नावात हारुन आहे तो विजयी कसा होईल?” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : मुंबईचा गड जिंकण्यासाठी ठाकरे गटाचा खास प्लॅन; अनिल परबांनी सांगितली रणनीती
पुढे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “इथपर्यंत तुमची वेळ गेली? कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार उर्दूत पत्रक काढत आहेत. कुठपर्यंत मजल गेली आहे बघा. मी मनसेच्या जाहिराती दिल्या मध्यंतरी वर्तमान पत्रांमध्ये. त्या तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणून इंग्रजीत जाहिरात नाही दिली. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या असतील तर तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) उरलं काय?” असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार निशाणा साधला.