शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्ताने राहुल गांधी यांची पोस्ट (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जोरदार प्रचार सुरु असून प्रचारासाठी शेवटचे अगदी काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. प्रियांका गांधी व राहुल गांधी हे देखील सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलावे अशी आरोळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोकली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 12 वी पुण्यतिथी आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसंच महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा वीर सावरकर यांच्याबाबत दोन शब्द बोलून दाखवा असे आव्हान दिले होते. यावर आता राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
काय आहे राहुल गांधींच्या पोस्टमध्ये?
सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्वांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आदरांजली वाहिली आहे. यामध्ये आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पोस्ट लिहित बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. “बाळासाहेब ठाकरे यांची १२ वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांची आठवण येते आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत.” अशी सोशल मीडिया पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.
Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महायुती व महाविकास आघाडीची ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कॉंग्रेस असे समीकरण पहिल्यांदाच बघायला मिळते आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे वेगवेगळे विचारधारा असलेले कॉंग्रेस व शिवसेना पक्ष पहिल्यांदाच एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांची ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिर्डीमधील जाहीर प्रचार सभेमध्ये कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत भाजपच्या आव्हानाला सडेतोड उत्तर दिले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने माझ्या भावाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते आहे. मी राहुल गांधी यांची बहीण आहे. मी बोलतीये नरेंद्र मोदी ऐकून घ्या..नीट ऐका…बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ऐकून घ्या. हे खरं आहे की आमची विचारधारा वेगळी होती. आमचा रस्ता आणि आमचे राजकीय विचार वेगळे होते. पण आमचा नेता काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, कोणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करु शकत नाही. करणार देखील नाही,” असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला दिले.