राहुल देशपांडे यांची 'अभंगावारी' आता १३ राज्यात आणि शहरात
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणारा विठुराय हा अभंगाने प्रसन्न होतो असं म्हणतात आणि अभंगाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव अशा अनेक संताचा महिमा लाभला असून ७०० वर्षांपासूनची ही परंपरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे हे जपत आहेत. आजच्या पिढीला अभंगाची ओळख, आवड जपता यावी, त्याबाबत अधिक माहिती व्हावी आणि अभंगांचा वारसा जपला जावा असं कोणाला वाटणार नाही आणि तोच वारसा अगदी मनोभावे राहुल देशपांडे हे पुढे घेऊन जात आहेत. ‘अभंगवारी’ ही आता भाषा, राज्याच्या सीमा आणि विविध पिढ्या याहीपलीकडे जाऊन आता १३ ठिकाणी राहुल देशपांडे सादर करणार आहेत आणि याच निमित्ताने ‘नवराष्ट्र’सह त्यांनी खास गप्पा मारल्या.
‘अभंगवारी’ ची कल्पना नेमकी कशी जन्माला आली? विचारले असता राहुल म्हणाले, ‘अभंगांची परंपरा ही समृद्धरित्या व्यापक पद्धतीने सर्वांपर्यंत पोहचावी अशी माझी इच्छा आहे आणि लहानपणापासून अभंग मी गातो आहे. तो माझ्या संगीताच आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे हे सर्वांसमोर सादर करण्याच्या इच्छेमुळेच मी ‘अभंगवारी’ करण्याचा निर्णय घेतला’
‘मी वसंतराव’साठी राहुल देशपांडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
संतांचे अभंग आजच्या काळात नव्याने सादर करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? हा प्रश्न तर यामुळे येणं साहजिकच आहे, त्यावर राहुल देशपांडे यांनी सांगितले की, ‘संतांचे विचार हे खरं तर कालातीत आहेत. जे आपले ७ सूर असतात ते जितके निर्मळ असतात तितकेच संताचे विचारही निर्मळ असतात. संगीताच्या माध्यमातून हे आजच्या पिढीपर्यंत पोहचवावं असं मला वाटतं की संगीतातून ते जास्त प्रखरपणे विचार पोहचू शकतात. आताची पिढी सुज्ञ आणि चांगलं संगीत ऐकणारी आहे त्यामुळेच ही प्रेरणा मला मिळाली.’
संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ यांच्या रचनांमध्ये तुम्हाला सर्वाधिक काय भावतं? या प्रश्नावर त्यांनी सहजपणे म्हटलं की, ‘खूप स्वतःशी जुळणारं असल्यासारखं वाटतं. खरं तर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली किंवा नामदेव महाराज असतील मला तुकाराम महाराजांचे अभंग सगळ्यात जास्त जवळचे वाटतात कारण ते सर्व काही अनुभवातून गेल्यानंतर येणारे ते व्यक्त होतात. ज्ञानेश्वर माऊली खूप कठीण आहेत समजायला, त्यांचं तत्वज्ञान, अभंगाच्या माध्यमातून असेल पण फार व्यापक विचार करावा लागतो. समजायला कठीण आहे आणि नामदेव महाराजांची भक्ती ही अत्यंत उत्कट आहे. हे सर्वच त्यांच्या अभंगातून मला जाणवतं’
“अभंगवारी” ही संकल्पना खूप प्रभावी आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नेण्यामागचा विचार काय? यावर राहुल देशपांडे म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, आपण भाग्यवान आहोत की, आपल्या महाराष्ट्राला समृद्ध अशी संत परंपरा लाभली आहे. संतांचे विचार हे भाषेच्या पलीकडचे आहेत. ते तत्वज्ञान सगळ्यांच्या आयुष्याचं उपयोगी ठरतं. फक्त ही अभंगवाणी महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात आणि जगभरात याचा प्रचार व्हायला हवा. ही आपली संस्कृती सादर करायला हवी. कारण ही खूपच जुनी परंपरा आहे, ती भक्ती परंपरा सगळीकडे सादर करण्याची संधी मिळते ही मोठी गोष्ट आहे आणि त्या निमित्ताने संगीताच्या माध्यमातून मला विचारही मांडता येतात’
महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षक अभंगांना कसा प्रतिसाद देतात? यावर राहुल यांनी अगदी मनापासून सांगितलं की, ‘मन भरून येतं कारण महाराष्ट्राच्या बाहेर जिथे आपली भाषा काही लोकांना कळत नाही, त्या अभंगाची उर्जा मात्र त्यांच्यापर्यंत पोहचते आणि त्यातील भाव श्रोत्यांपर्यंत आणि रसिकांपर्यंत पोहचतात. ते त्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया देतात आणि खरंतर हा भाषेच्या पलीकडचा हा अनुभव आहे’
आजच्या डिजिटल युगात अभंग तरुणांपर्यंत कसे पोहोचवता? यावर राहुल यांनी सांगितलं की, ‘आताच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी युट्युब, फेसबुक असो वा इन्स्टाग्राम हे उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे’ यानंतर आम्ही त्यांना त्यांंच्या अभंगवारीमधील असा कोणता क्षण आहे जो तुम्ही कधी विसरू शकणार नाही? असंही विचारल्यावर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं, ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा गजर होतो तेव्हा तो एक सामूहिक भक्तीमय वातावरण तयार होतं ना ते प्रत्येक खेपेला होतं आणि ते इतकं प्रामाणिक असतं की त्यात स्वतःला विसरायला होतं आणि फक्त विठ्ठलाचा नामघोष असतो आणि तो एक अत्यंत खास भक्तीमय असा क्षण असतो. सगळ्यांच्या सकारात्मक उर्जा यात असते’
अभंगवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांना काय नवीन अनुभवायला मिळणार आहे? यावर राहुल यांनी सांगितलं की, ‘मला वाटतं संतांच्या अभंगाचा, वाड्.मयाचा गाभा बदलत नाही. माध्यम संगीत आहे ते त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचतं. काही नव्या रचना मात्र यावेळी असतील ज्या मी आतापर्यंत गायलो नाही. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल अशी आशा आहे’






