पुण्यात कॉफी कल्चरचा वाढता प्रभाव (फोटो- ai gemini)
कार्यक्रमांमधून ग्राहकांना मिळतेय कॉफीच्या विविध प्रकारांची माहिती
कॅफे-आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनाही मोठा प्रतिसाद
जागतिक कॉफी संस्कृतीलाही शहराने स्वीकारले
पुणे: एकेकाळी कटिंग चहा आणि इराणी कॅफेची ओळख असलेल्या पुण्यात आता कॉफी कल्चर वेगाने रुजत असून, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिक यांच्यात त्याचे आकर्षण वाढत आहे. शहरात नव्या कॅफेंची संख्या वाढत असतानाच कॉफी टेस्टिंग, ब्रूइंग वर्कशॉप, लॅटे आर्ट स्पर्धा, कॉफी फेस्टिव्हल आणि कॅफे-आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
एफ.सी. रोड, कोरेगाव पार्क, बाणेर, औंध, बालेवाडी, विमाननगर आणि कल्याणीनगर या भागांत स्पेशालिटी कॉफी कॅफे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. येथे केवळ कॉफी पिण्यासाठी नव्हे, तर अभ्यास, फ्रीलान्स काम, स्टार्टअप मीटिंग, पुस्तक वाचन, संगीत कार्यक्रम आणि सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करण्यासाठीही तरुणांची गर्दी होत आहे.
कॅफे व्यावसायिकांच्या मते, सोशल मीडिया, परदेशी शिक्षण आणि प्रवासाचा अनुभव, तसेच जागतिक खाद्यसंस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे पुण्यातील तरुण पिढी नव्या खाद्यपदार्थ आणि पेय संस्कृती सहज स्वीकारत आहे. पूर्वी कॉफी ही केवळ इंस्टंट किंवा फिल्टर कॉफीपुरती मर्यादित होती; आता एस्प्रेसो, कॅपुचिनो, पोर-ओव्हर, कोल्ड ब्रू, फ्लॅट व्हाईट यांसारख्या विविध प्रकारांची मागणी वाढली आहे.
बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील
यासोबतच शहरात कॉफी फेस्टिव्हल, स्थानिक रोस्टर्सचे प्रदर्शन, कॉफी बनविण्याच्या कार्यशाळा आणि बारिस्ता स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. अशा कार्यक्रमांमधून ग्राहकांना कॉफीच्या विविध प्रकारांची माहिती मिळत असून, स्थानिक उद्योजकांनाही व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
कॅफे अकासाचा ‘मॉन्सून स्पेशल मील’ लॉन्च; पावसाळ्यातील चवींचा खास आस्वाद आता विमानप्रवासातही
मात्र या वाढत्या ट्रेंडकडे सामाजिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. एका कपासाठी २०० ते ४०० रुपये खर्च करण्याची तरुणांची तयारी, कॅफेमध्ये तासन्तास घालविण्याची सवय आणि सोशल मीडिया-केंद्रित जीवनशैली यावर काही अभ्यासक प्रश्न उपस्थित करतात. दुसरीकडे, कॅफे संस्कृतीमुळे संवाद, नेटवर्किंग, सर्जनशीलता आणि स्वतंत्र काम करण्यासाठी अनुकूल जागा उपलब्ध झाल्याचे मतही ग्राहकांनी व्यक्त केले जाते. पुण्याच्या पारंपरिक चहासंस्कृतीसोबतच आता जागतिक कॉफी संस्कृतीलाही शहराने स्वीकारले असून, बदलत्या जीवनशैलीचे हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढे येत आहे.






