Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार 'ते' सत्य; पुढे काय होणार?
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी विश्वाला एक सत्य सांगत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी जयंत तिथे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विश्वाला सत्य कळणार पण जयंतपासून जान्हवीला कोण वाचवणार?, या कॅप्शनसह इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
मालिका सुरु झाल्यानंतर काही काळाने जान्हवी आणि जयंत यांचे लग्न झाले होते. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्न झाल्यानंतर जयंत जान्हवीला खूप त्रास देऊ लागला होता. तो तिच्यासोबत अतिशय विचित्र पद्धतीने वागायचा. तसेच जयंतने जान्हवीच्या आजीला आणि जान्हवीच्या काही मित्रांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला. याच सर्व गोष्टींना कंटाळून अखेर जान्हवीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने पाण्यात उडली मारली होती. मात्र त्यानंतर ती विश्वाच्या वडीलांना भेटली आणि काही दिवस विश्वाच्या घरी राहत होती.
यानंतर जेव्हा जान्हवीने जेव्हा तिच्या कुटूंबाला भेटण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. तिला तिचं आणि जयंतचं नात देखील आठवत नव्हतं. यानंतर जयंतने पुन्हा एकदा जान्हवीला इंप्रेस करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि अखेर जान्हवी पुन्हा जयंतच्या प्रेमात पडली. या सर्व परिस्थितीत जान्हवीचा सर्वात जवळचा मित्र विश्वा तिला वारंवार भुतकाळात घडलेल्या घटनांची आठवण करून देत होता. जेव्हा जान्हवी दुसऱ्यांदा जयंतसोबत लग्न करण्यासाठी बोहोल्यावर चढली, त्याक्षणी तिला संपूर्ण भूतकाळ आठवला. जान्हवीने जयंतला अद्दल घडवण्यासाठी पुन्हा त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, जान्हवी आणि विश्वा एकमेकांसोबत बोलत आहेत. जान्हवी विश्वाला सांगत आहे की, “माझी मेमरी परत आली आहे. मला सगळं काही आठवतंय. मला जयंतवर सूड उगवायचा आहे आणि म्हणून मी त्याच्याशी पुन्हा लग्न केलं.” हे सर्व ऐकूण विश्वाला धक्का बसतो. विश्वा जान्हवीला म्हणत आहे की, “ज्या जयंतपासून सुटका करण्यासाठी तू पाण्यात उडी मारलीस, त्याच जयंतच्या कचाट्यात पुन्हा सापडू लागलीस…?” हे बोलण सुरु असतानाच जयंत तिथे येत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पाहून पुढे काय होणार अशी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.






