(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
देऊळ बंद चित्रपटाचा पहिला भाग दहा वर्षांपूर्वू प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद’ चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या २१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. “आता परीक्षा देवाची…” या अत्यंत आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक टॅगलाईनसह येत असलेला हा भव्य चित्रपट येत्या २१ मे २०२६ रोजी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘देऊळ बंद २’ चे कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष या विषयांवर प्रकाश टाकणारे आहे. देऊळ बंद २ मध्ये एक शेतकरी महिला आता देवाची परिक्षा घेणार आहे. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे बरेच प्रश्न ही महिला देवाला विचारणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्षासोबतच, या भागात देवाचे अस्तित्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयीची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे.
ट्रेलरची सुरुवातच एका आव्हानात्मक संवादाने होते, जिथे स्वामी समर्थांच्या अस्तित्वाला एका भक्ताची परीक्षा द्यावी लागत आहे. “बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा त्यात शेतकऱ्याची…” “या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!” यांसारखे संवाद थेट मनाला भिडतात आणि चित्रपटाची संवेदनशीलता अधोरेखित करतात. “रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या आठ दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे… जर झाली तर माझं देऊळ बंद कायमचं!” हा ट्रेलरमधील सर्वात शक्तिशाली संवाद असून, तोच चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे व येथे देवालाच त्याच्या अस्तित्वाची आणि कृपेची परीक्षा देण्याचे थेट आव्हान देण्यात आले आहे.
या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा ‘स्वामी समर्थांच्या’ दैवी भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यांच्यासोबत स्नेहल तरडे, आणि स्वतः प्रवीण तरडे सदूशेठ नावाच्या १०० तोंडांच्या रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची भव्य निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी – सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्रीकरण ट्रेलरमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या “देऊळ बंद २” मध्ये स्वामी भक्तीचा गजर आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा मिलाफ कौटुंबिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
देऊळ बंद २ चित्रपटातील कलाकार
या चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह ‘लाखात एक आमचा दादा’ फेम शत्रू म्हणजेच अतुल कुदळे, पिट्याभाई म्हणून प्रसिद्ध रमेश परदेशी, तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा समावेश आहे.
याशिवाय महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
अशा दमदार कलाकारांच्या उपस्थितीमुळे ‘देऊळ बंद २’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून, हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.






