फोटो सौजन्य - Social Media
पुढे बोलताना हृताने लेखिका कल्याणी पंडित आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक केलं. “या मालिकेचा लुक, फील आणि एकूणच टोन खूप नैसर्गिक आहे. नव्या घरात जाण्याची धाकधूक, नव्या नात्यांशी जुळवून घेणं आणि दोन्ही बाजूंनी होणारे प्रयत्न हे सगळंच खूप खरं आणि जवळचं वाटतं. त्यामुळे श्रेयाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे,” असं ती म्हणाली.
लग्नानंतर श्रेयाची व्यक्तिरेखा पुण्याहून कोल्हापूरला येते. हा प्रवास आजच्या तरुणींना किती जवळचा वाटेल, याबद्दल विचारलं असता हृता म्हणाली, “आम्ही या मालिकेतून कोणालाही काही शिकवण्याचा किंवा उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही मुख्यतः श्रेया, तिची आई आणि तिची सासू यांच्या नात्यांची गोष्ट आहे. त्यांचा प्रवास प्रामाणिक आणि रिलेटेबल आहे. त्यामुळे यातून काही शिकण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्यांचा हा प्रवास अनुभवावा आणि एन्जॉय करावा, एवढंच मला वाटतं.”
सासू-सुनेच्या नात्याबद्दलचे ठरलेले समज आणि साचेबद्ध प्रतिमांबाबतही हृताने आपलं मत स्पष्ट केलं. “प्रत्येक नातं सारखंच असतं असं नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आज अनेक घरांमध्ये सून ही कुटुंबाचा समान सदस्य म्हणून स्वीकारली जाते. तिच्या विचारांना, मतांना आणि व्यक्तिमत्त्वाला तितकाच आदर दिला जातो. ही समानता आणि परस्परांचा आदर प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासासाठीही खूप महत्त्वाचा आहे,” असं ती म्हणाली. कौटुंबिक नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, नव्या नात्यांशी जुळवून घेण्याचा प्रवास आणि आई-सासू-सुनेतील नात्याचा वेगळा पैलू उलगडणारी ‘अगं अगं अहो आई’ ही वेब सिरीज प्रेक्षकांना झी ५ मराठीवर पाहायला मिळणार आहे.






