(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aga Aai Aaho Aai Review: सासू-सुनेचं नातं म्हणजे वाद, टोमणे आणि कटकारस्थान अशी प्रतिमा आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत पाहायला मिळाली. मात्र झी ५ मराठीवरील ‘अगं आई अहो आई’ ही वेब सिरीज या चौकटीला छेद देत सासू, आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम, समजूतदारपणा आणि जिव्हाळ्याच्या नात्याची सुंदर कहाणी सांगते.
कथेच्या केंद्रस्थानी आहे पुण्यात वाढलेली श्रेया (हृता दुर्गुळे). लग्नानंतर नव्या घरातील माणसं, वेगळ्या चालीरीती आणि नव्या नात्यांशी जुळवून घेताना तिचा प्रवास अनेक भावनिक वळणं घेतो. रेणुका शहाणे श्रेयाच्या आईच्या भूमिकेत, निर्मिती सावंत प्रेमळ आणि समंजस सासू सुनिताताईंच्या भूमिकेत, तर सुयोग गोऱ्हे अनिशच्या भूमिकेत सहज आणि नैसर्गिक अभिनय करताना दिसतात.
“लग्न झाल्यावर फक्त नवरा-बायको एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंबं एकत्र येतात,” ही संकल्पना मालिकेच्या पहिल्याच प्रसंगातून प्रभावीपणे मांडली जाते. कोल्हापूरचा अनिश आपल्या एकत्र कुटुंबाची ओळख श्रेयाशी करून देतो. अनेक नव्या चेहऱ्यांमध्ये गोंधळलेली श्रेया जेव्हा घरात प्रवेश करते, तेव्हा सुनिताताई तिचा हात हातात घेऊन प्रेमाने घरात आणतात. हा साधा पण हृदयस्पर्शी प्रसंग मालिकेचा सूर ठरवतो.
लग्नानंतर श्रेयाची आई तिला भेटण्यासाठी येते. आपल्या मुलीने सासूला “आई” म्हणून हाक मारणं, तिच्याकडून घरातील गोष्टी शिकणं आणि तिला स्वतःच्या आईइतकंच मानणं पाहून तिच्या आईच्या मनात होणारी घालमेल वास्तववादी पद्धतीने मांडली आहे. मात्र त्याचवेळी आई मुलीच्या प्रत्येक अडचणीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
मालिकेतील सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे मंगळागौरीच्या दिवशी श्रेयाला आलेली मासिक पाळी. कार्यक्रमाच्या दिवशीच आलेल्या या अडचणीमुळे ती आधी आईला सांगते. मात्र श्रेयाची अस्वस्थता ओळखून सासूबाई स्वतः पुढाकार घेतात. त्या श्रेयासाठी काढा बनवतात, गरम पाण्याची पिशवी देतात आणि आईप्रमाणे तिची काळजी घेतात. या एका प्रसंगातून सासू-सुनेचं नातं आई-लेकीच्या नात्यात कसं रूपांतरित होतं, हे अत्यंत सुंदररीत्या दाखवण्यात आलं आहे.
मालिकेची खरी ताकद तिच्या छोट्या-छोट्या प्रसंगांत आहे. बारशाचा कार्यक्रम, घरातील विविध समारंभ, श्रेयाच्या आणि सासूबाईंच्या गप्पा, अनिश आणि श्रेयाच्या आईमधील वाढत जाणारं आई-मुलाचं नातं, तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांसाठी उभी राहताना दिसणारे प्रसंग कथेला अधिक भावनिक आणि वास्तववादी बनवतात.
मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची कथनशैली. प्रत्येक भागाची सुरुवात श्रेया आणि अनिश यांच्या लग्नाआधीच्या आयुष्यातील एका छोट्याशा प्रसंगाने होते. त्यानंतर कथा वर्तमानकाळात येते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील एखादा नवा अनुभव, नात्यांमधील बदल किंवा भावनिक प्रसंग उलगडत जातो.
कथेला आणखी भावनिक वळण तेव्हा मिळतं, जेव्हा श्रेयाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. या कठीण प्रसंगात अनिश जावई म्हणून नव्हे, तर घरातील मुलगा म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. त्याची आईही पुण्यात येऊन श्रेयाच्या माहेरच्या कुटुंबाला आधार देते. मात्र या सर्वांमध्ये आई आणि अनिश यांच्यात वाढत जाणारं आई-मुलाचं नातं पाहून श्रेयाच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता अतिशय सूक्ष्मपणे दाखवण्यात आली आहे.
सीरिजमधील सर्वात वेगळा आणि लक्षवेधी पैलू म्हणजे सासू आणि सुनेचं नातं. सामान्यतः आईला मुलीच्या मनातील घालमेल सर्वप्रथम समजते, पण इथे चित्र वेगळं आहे. सुनिताताईंना श्रेयाच्या मनात काय सुरू आहे, तिची अस्वस्थता काय आहे, हे शब्दांशिवाय कळतं आणि त्या त्यानुसार तिची साथ देतात. त्याचप्रमाणे माहेर आणि सासर यांच्या नात्यांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप किंवा कृत्रिम संघर्ष दाखवण्याऐवजी परस्पर समजूतदारपणाला महत्त्व देण्यात आलं आहे. त्यामुळे कथानक कुठेही ओढूनताणून वाटत नाही.
श्रेया दोन्ही कुटुंबांमध्ये सुंदर समतोल साधताना दिसते. कोल्हापूरची सासू आणि पुण्याची आई यांचं नातं मैत्रिणींप्रमाणे फुलतं, तर अनिश आणि श्रेयाच्या आईचं आई-मुलाचं नातं अधिक घट्ट होतं. तर श्रेया आणि अनिशचे वडील त्यांच्या-त्यांच्या जागी अगदी परफेक्ट दाखवले आहेत. शेवटच्या भागात श्रेया सासूबाईंसोबत, तर अनिश श्रेयाच्या आईसोबत सरप्राईजचा प्लॅन करताना दिसतो, त्यामुळे शेवटही उत्सुकता वाढवणारा ठरतो.
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ‘अगं आई, अहो आई’मधून सासू-सून, सासू-जावई आणि विहीणबाई या नात्यांमधील मैत्रीचा एक वेगळाच पैलू उलगडला आहे. कृत्रिम नाट्य, अनावश्यक संघर्ष किंवा नकारात्मकता टाळून त्यांनी नात्यांतील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाचा प्रवास प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे ही वेब सिरीज केवळ मनोरंजन करत नाही, तर नात्यांचा खरा अर्थही नव्याने समजावून सांगते.
वेब सीरिज: अगं आई, अहो आई
ओटीटी: ZEE5 Marathi
दिग्दर्शक: वरुण नार्वेकर
लेखन: कल्याणी पंडित
कलाकार: हृता दुर्गुळे, निर्मिती सावंत, रेणुका शहाणे, सुयोग गोऱ्हे
प्रकार: फॅमिली ड्रामा | भावनिक
दर्जा: ⭐⭐⭐⭐






