(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सन मराठीवरील लोकप्रिय भक्तिमय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. या मालिकेत संत सखुबाई यांची बालपणीची भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे हिने साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती.
आता मालिकेत संत सखुबाईंच्या निस्सिम भक्तिगाथेचं नवं आवर्तन पाहायला मिळणार आहे. कथानकात तब्बल ८ वर्षांचा लीप घेतला जाणार असून, या नव्या टप्प्यात संत सखुबाईंची भूमिका अभिनेत्री सान्वी जांबेकर साकारणार आहे.यासंदर्भातील नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून मालिकेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. या निमित्ताने मालिकेची प्रेस कॉन्फरन्स सेटवर पार पडली. यावेळी मालिकेतील कलाकार, निर्माते संगीत कुलकर्णी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.येत्या ४ जूनपासून ‘सखा माझा पांडुरंग’मधील संत सखुबाईंचं नवं आवर्तन दररोज सायंकाळी ७:३० वाजता सन मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
“संत सखुबाई या एक सामान्य स्त्री आहेत. पण निव्वळ विठ्ठलाच्या भक्तीत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक संकटाचा सामना त्यांनी केला. आताच्या प्रत्येक स्त्रीसाठी संत सखुबाई आदर्श आहेत. मुख्य म्हणजे संत सखुबाई यांच्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. इतर संतांविषयी आपल्याला बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं. त्यामुळे या मालिकेमुळे प्रेक्षकांना संत सखुबाईंचं अस्तित्व आणि त्यांचा खडतर प्रवास पाहायला मिळतो. ८ वर्षांच्या लीपनंतर सखुबाईंची निस्सिम भक्ती आणि त्यांचा संघर्ष नव्याने दिसणार आहे. त्यांचा हा संघर्ष केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”
संत सखुबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांबेकर या भूमिकेबद्दल म्हणाली की,“संत सखुबाई यांची भूमिका साकारायला मिळणं याहून मोठं दुसरं काही असूच शकत नाही. प्रेक्षकांनी या मालिकेवर, सखुवर प्रचंड प्रेम केलं आहे. म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. पण विठ्ठल माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या भूमिकेसाठी मी मालिकेचे सगळे भाग २-३ वेळा पाहिले आहेत. सखुच्या छोट्या छोट्या छटा मी लक्षात ठेवते. मालिकेची संपूर्ण टीम मला खूप मदत करते. मालिकेचा पहिला भाग शूट करताना मी २४ तास पाण्यात भिजले होते. संत सखुबाईंनी आतापर्यंत खूप सोसलं आहे, त्यामुळे या संकटांना तोंड द्यायला मी तयार आहे. प्रेक्षकांनी छोट्या सखुवर जितकं प्रेम केलं, तितकंच प्रेम माझ्यावरही करतील अशी आशा आहे.”






