( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकांची परंपरा जपणाऱ्या नाटकांमध्ये आता आणखी एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक लवकरच ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, पोस्टर प्रदर्शित होताच या नाटकाने रसिकांची उत्सुकता वाढवली आहे. “बुद्धी आणि भावना यांना स्पर्श करणारं नाटक!” या एका ओळीनेच नाटकाच्या कथानकाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी अनपेक्षित घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणे, दडलेली सत्यं, गुंतागुंतीच्या भावना आणि प्रत्येक उत्तरानंतर निर्माण होणारे नवे प्रश्न याभोवती या नाटकाची कथा फिरते. कथानकातील रहस्य शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.
तगड्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका
या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तगड्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील विविध पैलू आणि भावविश्व उलगडणार आहे.
नाटकाचे दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, “‘काटकोन त्रिकोण’ हा एक कौटुंबिक थ्रिलर आहे. प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडवलेली सत्यं आणि काळानुसार बदलणारी नाती असतात. त्या बदलांचा वेध हे नाटक घेतं. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतानाच ते स्वतःच्या नातेसंबंधांकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडेल.”
या नाटकाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून दिग्दर्शन अजित भुरे यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाशयोजना शीतल तळपदे, संगीत साई पियुष यांचे असून नितीन नाईक सूत्रधार आहेत. चौरंगी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






