(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दीपज्योती’ या मालिकेत अभिनेत्री मानसी सुभाष ‘प्रीती’ ही भूमिका साकारत आहे. ती या मालिकेत ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण असून अभिजीतची लाडकी बहीण आहे.मानसीने सांगितले की, तिची व्यक्तिरेखा सुरुवातीला खूप प्रेमळ, स्पष्ट बोलणारी आणि कुटुंबाची काळजी घेणारी आहे. विशेषतः ती आपल्या भावाबद्दल खूपच प्रोटेक्टिव्ह आहे आणि त्याला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेते.पुढे कथेत तिच्या आयुष्यात मोठे बदल होतात. पण जसजशी मालिका पुढे जाते, तसतशी तिच्या लाडक्या भावाचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात होतो.
या परिस्थितीच्या दबावामुळे ती हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते. मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. तेव्हा मला खूप आनंद झाला. मुळात मी प्रीतीच्या भूमिकेसाठी आले होते, पण ज्योतीच्या कॅरेक्टरसाठीही मी अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. नंतर मला कळवण्यात आले की माझी निवड प्रीतीच्या भूमिकेसाठी झाली आहे, जी ज्योतीची मोठी बहीण आहे. सुरुवातीला सकारात्मक असलेली मुलगी नंतर खलनायिकेकडे झुकते हा प्रवास साकारताना मला खूप मजा येईल, असे मला वाटते. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, पण नंतर लक्षात आले की ही व्यक्तिरेखा परिस्थितीनुसार बदलणारी आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. तयारी म्हणून मी खूप लहानसहान गोष्टींवर काम करत आहे. प्रेक्षकांना मी खलनायिका वाटली पाहिजे, यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, तिला कोणत्या गोष्टींवर राग येतो, ती कशी प्रतिक्रिया देते, अचानक वाईट वाटल्यावर ती कशी वागते आणि रागानंतर कशी शांत होते यावर मी सातत्याने सराव करत आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेची बॅकस्टोरी समजून घेते आणि तिच्या अॅक्शन-रिअॅक्शनचा सखोल विचार करते.
या आधी मी खलनायिकेची भूमिका साकारलेली नाही. प्रीतीच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमुळे ती खलनायिका बनते. हा बदल साकारणे माझ्यासाठी खूप रोचक आहे. मालिकेत तिचा जिवाभावाचा भाऊ आणि तिचा होणारा नवरा सुजय एका क्षणात तिच्या आयुष्यातून निघून जातात. या मोठ्या धक्क्यामुळे ती खलनायिकेसारखी वागू लागते. त्यामुळे ती परिपक्व खलनायिका म्हणून नव्हे, तर परिस्थितीमुळे बदललेली व्यक्ती म्हणून प्रेक्षकांसमोर येईल, असे मला वाटते. प्रोमो पाहून अनेक लोकांनी मला फोन केले. ज्यांचा बऱ्याच वर्षांपासून संपर्क नव्हता, अशा लोकांनीही माझे अभिनंदन केले. माझी निवड झाल्याचा त्यांना खूप आनंद झाला. सहकलाकार आणि टीम खूप छान आहे. मालिकेतील ज्योती, कीर्ती, अभिजीत आणि मी आम्ही सगळे खूप वेळ एकत्र घालवतो आणि खूप मजा करतो. जेवतानाही आम्ही एकत्र असतो. सेटवरील सर्वजण समजून घेणारे आणि सहकार्य करणारे आहेत.
आमची तिघींची मस्त गट्टी जमली आहे. सेटवर आम्हा तिघींमधील कोणी एक जरी नसले, तरी खूप रिकामेपणा जाणवतो. एकदा माझा आणि ज्योतीचा सीन होता, पण कीर्ती शूटला नव्हतं तेव्हा आम्हाला खूप वेगळं वाटलं. जणू आमच्यातील एखादा भागच हरवला आहे, असा अनुभव आला. आमची इतकी घट्ट मैत्री झाली आहे की, आम्हा तिघींमधील कोणी एक नसले तर सेटवर सगळे तिची चौकशी करतात.
अभिनयाची आवड पहिल्या पासूनच होती. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये मी नाटकांमध्ये भाग घेतला. कॉलेजच्या वार्षिक महोत्सवातही मी सक्रियपणे सहभागी होत असे. मला नृत्याचीही खूप आवड आहे. घरी सगळे मला “हिरोईन” म्हणून हाक मारायचे.
कुमार सोहोनी यांचं १२५वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला; रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा अनोखा प्रयोग






