(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रेक्षकांच्या आवडत्या दोन मालिका एकत्र आल्या की छोट्या पडद्यावर होणारा धमाका काही वेगळाच असतो. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’ लवकरच विशेष महासंगम भागासाठी एकत्र येत असून, प्रेक्षकांसाठी हा भाग मोठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
या महासंगम भागात दोन्ही मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटताना कथेत केवळ संवादच नव्हे, तर मोठा ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळणं पाहायला मिळणार आहेत. दोन वेगवेगळ्या कथानकांचा हा संगम प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभवाची अनुभूती देणार आहे.मनोरंजन, उत्सुकता आणि नाट्यमय वळणांनी भरलेला हा महासंगम भाग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार यात शंका नाही.सध्याच्या कथानकानुसार, एकीकडे ‘कमळी’ आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे. तर दुसरीकडे, ‘सनई चौघडे’ मालिकेत जय आणि शर्वरी हे असावरी आणि गौतम यांच्या लग्नासाठी प्रचंड चिंतेत आहेत. अशाच एका कठीण प्रसंगात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी यांची भेट होणार आहे. कमळी कामाच्या शोधात थेट पमाकडे पोहोचणार आहे.
जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी हे चौघे मिळून एक मोठा निर्णय घेणार आहेत. असावरी आणि गौतम यांच नाव एका ‘सामूहिक विवाह सोहळ्या’ साठी नोंदवणार आहे. विशेष म्हणजे, हा सामूहिक विवाह सोहळा राजन यांनी ‘अन्नपूर्णा’ यांच्या नावाने आयोजित केला आहे. सर्व काही सुरळीत चालू असतानाच, या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी दोन मोठ्या खलनायिका अनिका आणि समायरा एकत्र येणार आहेत. या दोन्ही खलनायिका या महासंगमात एकत्र येऊन काहीतरी नवीन कट रचणार आहेत. जो कमळी आणि शर्वरी या दोघींना मोठं नुकसान पोचवणार आहे. आता या खलनायिकांच्या दुष्ट कारस्थानामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यात असावरी आणि गौतम यांचे लग्न यशस्वीपणे पार पडेल का? की या सगळ्या गोंधळात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी सुद्धा अडकले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या महासंगमात मिळणार आहेत.
‘कमळी’ या मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर हिने ‘सनई चौघडे’सोबत झालेल्या महासंगम शूटचा अनुभव शेअर केला आहे. झी मराठीवरील या विशेष एपिसोडसाठी दोन्ही मालिकांचे कलाकार एकत्र आल्यामुळे शूटिंगचा अनुभवही तितकाच उत्साहवर्धक आणि आव्हानात्मक ठरल्याचे तिने सांगितले.
विजया बाबर म्हणाली की, “आमचा हा तिसरा महासंगम आहे. याआधी ‘तारिणी’, ‘लक्ष्मी निवास’ आणि आता ‘सनई चौघडे’ टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप मजा येत आहे. राजूसरांसोबत आम्हा सर्वांनाच काम करायचं होतं आणि आम्ही खूप उत्साहित होतो.”
ती पुढे म्हणाली की महासंगम शूटिंग करणे सोपे नसते कारण एकाच वेळी खूप मोठी टीम असते आणि साधारण एक तासाचा एपिसोड शूट करावा लागतो. त्यात उन्हाळ्याचा त्रासही असतो, पण ‘कमळी’ टीमला अशा शूटिंगची सवय झाल्यामुळे आम्ही पूर्ण जोमाने तयारीत असतो.
या विशेष महासंगम भागात ऋषी आणि कमळी यांच्या नात्याला एक नवी दिशा मिळणार असल्याचेही तिने सांगितले, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.






