(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या परिवाराने एक उपक्रम राबवला आहे. जागतिक रंग दिनाच्या निमित्ताने ‘आनंदी’ परिवाराने श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टमधील दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात आनंदाचे रंग भरले. रंग म्हणजे केवळ दिसणाऱ्या छटा नाहीत, तर त्या स्पर्शात, आवाजात, भावनांमध्ये आणि अनुभवांमध्येही जगता येतात याचा जिवंत अनुभव या उपक्रमातून साकारला. या मुलांनी इंद्रधनुष्य फक्त रंगवलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. प्रत्येक रंगासोबत एक वेगळी भावना, एक नवा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलताना दिसत होता. त्या निरागस हास्यात, त्या उत्साहात आणि त्या अनोख्या अनुभवात ‘रंग’ खऱ्या अर्थाने जिवंत झाले. डोळ्यांना दिसणाऱ्या रंगांपेक्षा मनाने जाणवणारे रंग किती समृद्ध असतात, याची जाणीव आनंदी मालिकेच्या कलाकारांसोबत अधिक गडद झाली. हा अनुभव केवळ एक उपक्रम नव्हता तर संवेदनांचा आणि भावनांचा एक सुंदर उत्सव होता जो प्रत्येकासाठीच कायम स्मरणात राहणारा ठरला.
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विविध विषय हाताळत प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन केलं आहे. याच यशस्वी परंपरेला पुढे नेत, आता वाहिनी एक हृदयस्पर्शी कथा घेऊन सज्ज झाली आहे. येत्या ३० मार्चपासून, दररोज रात्री ९.३० वाजता, स्टार प्रवाहवर सुरू होणार नवी मालिका ‘आनंदी’. मालिकेच्या शीर्षकाला साजेशीच ही कथा आहे आनंदीची. एका अपघातात दृष्टी गमावलेली, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारी एक तरुणी. डोळ्यांनी जग दिसत नसतानाही, ती आपल्या मनाने आणि संवेदनांनी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून, तिची सर्वात मोठी ताकद आहे. आनंदीच्या भूमिकेत दिसणार आहे नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर, युगंधर निंबाळकर ही भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी आणि आनंदीच्या आजोबांची म्हणजेच आत्माराम जाधव ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत दिग्गज अभिनेते अरुण नलावडे.






