(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Main Vaapas Aaunga OTT Release: प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ (Main Vaapas Aaunga )हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भावनिक कथानक, दमदार अभिनय आणि बॉक्स ऑफिसवरील यशामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले. आता ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही किंवा पुन्हा पाहायचा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
निर्मात्यांनी ‘मैं वापस आऊंगा’च्या OTT रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट ७ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर (Netflix) स्ट्रीम होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डिजिटल प्रीमियर होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी प्रेमकथा
‘मैं वापस आऊंगा'( Main Vaapas Aaunga )ही केवळ प्रेमकथा नाही, तर १९४७ मधील भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदनादायी घटनांवर आधारित भावनिक कथा आहे. धर्म आणि फाळणीमुळे विभक्त झालेल्या दोन प्रेमींची कहाणी अनेक दशकांनंतरही प्रेमाची ताकद आणि नात्यांची खोली अधोरेखित करते. चित्रपटातील भावना, संघर्ष आणि आठवणी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
कलाकारांचा दमदार अभिनय
चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जुन्या आठवणी आणि अपूर्ण राहिलेल्या वचनांशी झुंज देणाऱ्या वृद्धाची प्रभावी भूमिका साकारली आहे. दिलजीत दोसांझ यांनी त्यांच्या नातवाची भूमिका साकारत कथेला वेगळी उंची दिली आहे.
याशिवाय, फ्लॅशबॅकमधील प्रेमकथेत वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि नैसर्गिक अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे.
चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक प्रभावी बनवण्याचं काम ए. आर. रहमान यांच्या संगीताने केलं आहे. त्यांच्या सुरेल संगीतामुळे प्रत्येक प्रसंग अधिक भावनिक आणि संस्मरणीय झाला आहे.
थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आता ‘मैं वापस आऊंगा’ OTTवरही प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.






