( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप 2’ हा रिअॅलिटी शो सध्या विविध वादांमुळे चर्चेत आहे. शोमध्ये रोज नवे टास्क, वाद आणि स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आता या शोमध्ये अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर श्रेया कालरा हिने अभिनेता राम कपूर यांच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गेल्या आठवड्यातील एका टास्कदरम्यान राम कपूर आणि श्रेया कालरा एकाच टीममध्ये होते. या टास्कमध्ये श्रेयाने उत्कृष्ट कामगिरी करत राम कपूर याला एलिमिनेशनपासून वाचवले. टास्क जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात राम कपूर यांनी श्रेयाच्या कपाळावर आणि गालावर अनेकदा किस (Kiss) केले. मात्र, या कृतीमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे श्रेयाने आता स्पष्ट केले आहे.
अलीकडील भागात शिल्पा शिंदेसोबत बोलताना श्रेया म्हणाली, “जेव्हा शिवांगी टास्क करत होती, तेव्हा राम कपूर तिच्या खूप जवळ गेले. हर्षदने त्यांना दूर केलं आणि नंतर माफी मागू लागला. पण माफी कशासाठी? प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात.”
याच संभाषणात तिने स्वतःसोबत घडलेल्या प्रसंगाचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “जर त्यांनी पुन्हा मला किस करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांचं तोंड पकडून सांगेन, ‘दादा, माझे वडीलसुद्धा मला इतकं किस (Kiss) करत नाहीत. कृपया असं करू नका.’
View this post on Instagram
श्रेयाने पुढे राम कपूरबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले, “मी त्यांच्यासाठी तीन टास्क जिंकले, पण त्यांनी माझ्या समर्थनार्थ एकदाही आवाज उठवला नाही. मग अशा सिनियर कलाकाराचा मी आदर का करावा?”
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी श्रेयाच्या भावना समजून घेत तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी राम कपूर यांची कृती आनंदाच्या भरातील नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचे म्हटले आहे.






