संग्रहित फोटो
कल्पना करा की मधुमेहाचे व्यवस्थापन फक्त औषधांद्वारे किंवा कॅलरीचे मोजमाप करण्यावर अवलंबून नसून, तुमच्या ताटातील पदार्थांवरही अवलंबून आहे. अलीकडील अभ्यास आणि तज्ज्ञांच्या अनुभवांनुसार, आपण किती खातो यापेक्षा काय खातो हे आपल्या रक्तातील साखरेवर जास्त प्रभाव टाकू शकते आणि अनेकांसाठी शाकाहार (व्हेगन) असलेला आहार स्वीकारणे साखर नियंत्रणाच्या दृष्टीने हे परिवर्तनकारी ठरू शकते.
सामान्यत: शाकाहारी आहारापेक्षा व्हेगन आहाराचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. यामध्ये सर्व प्राणिजन्य पदार्थ वर्ज्य असतात आणि पूर्णपणे वनस्पती-आधारित अन्नपदार्थांवर ते अवलंबून असते. हे नैसर्गिकरीत्या रक्तातील साखर स्थिर ठेवते, सूज कमी करते आणि एकूणच चयापचय आरोग्य सुधारते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी, हे फक्त वजन कमी करण्यापुरते मर्यादित नसून; हे आपल्या शरीराला साखरेला अधिक निरोगी पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी पुन: प्रशिक्षित करण्याबद्दलचे तंत्र आहे. त्यामुळे औषधांची गरज कमी होऊ शकते आणि गुंतागुंत टाळता येऊ शकतात.
मधुमेहासाठी व्हेगन आहार का उपयुक्त ठरतो?
तज्ज्ञांच्या मते, शाकाहारी आहारात तंतुमय घटक (फायबर), अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्याने थेट इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. व्हेगन आहाराकडे वळल्याने काही फायदे होतात, जसे सुधारलेली इन्सुलिन संवेदनशीलता, त्यामुळे पेशींना साखर अधिक कार्यक्षमतेने नियंत्रित करता येते. वजनाचे चांगले व्यवस्थापन होते, कारण वनस्पती-आधारित अन्नात उच्च कॅलरी फॅट्स कमी असतात. सूज कमी होण्यास मदत होते कारण फळे, भाजीपाला आणि कडधान्यांतील वनस्पतीजन्य पोषकद्रव्यांचा उपयोग होतो. संशोधन सातत्याने दाखवते की शाकाहारी आहार पाळणाऱ्या लोकांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो आणि अनेक रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठोस सुधारणा दिसून येते.
अगदी आहारातील लहान बदलसुद्धा लक्षात येतील असे परिणाम देऊ शकतात. उदा. कार्बोहायड्रेट्स आणि उच्च-फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थांच्या जागी मसूर, बीन्स आणि भाज्या घेतल्यास दिवसभर रक्तातील साखर स्थिर राहते आणि रक्तातील चढउतार कमी होतात.
शाकाहार आणि व्हेगन यामध्ये फरक काय आहे?
अनेक भारतीय आधीपासूनच शाकाहारी आहार घेतात. त्यामध्ये दूध, तूप आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ असतात. या पदार्थांचे काही आरोग्यदायी फायदे असले तरी, त्यात संतृप्त चरबी (ट्रान्स फॅट) आणि लपलेली साखरही असते, जी रक्तातील साखर नियंत्रणात अडथळा निर्माण करू शकते. व्हेगन आहारात हे पदार्थ वगळले जातात आणि पूर्णपणे वनस्पती-आधारित अन्नावर लक्ष केंद्रित केले जाते. परिणामी नियंत्रणात असलेले कोलेस्टेरॉल, कमी सूज आणि ग्लुकोज व्यवस्थापन हे वजन नियंत्रण ठेवण्यापलीकडील फायदे यामध्ये दिसून येतात. मात्र, व्हेगन आहार सर्वांसाठी योग्य नसतो, कारण काही वयोगट, गर्भावस्था किंवा मधुमेहाच्या विशिष्ट प्रकारांमध्ये आहारात बदल आवश्यक असतात. मोठे आहारातील बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
टाळावयाच्या सामान्य चुका
‘व्हेगन’ बनल्याने आपोआप आहार निरोगी होतोच असेही नाही. अनेक लोक प्रक्रियायुक्त व्हेगन अन्नपदार्थांवर (पॅकेज्ड स्नॅक्स, मॉक मीट) अवलंबून राहतात. त्यामध्ये साखर किंवा कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असू शकते. काही जण अजाणतेपणी आवश्यक पोषक घटकांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी १२, लोह किंवा प्रथिनांच्या कमतरता निर्माण होऊ शकतात. शिवाय, आहारातील मोठे बदल एकदम केल्यास ते टिकवणे अवघड जाते. महत्त्वाचे म्हणजे, हळूहळू सुरुवात करा, अधिक कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि भाज्या आहारात समाविष्ट करा आणि प्राणिजन्य पदार्थ हळूहळू कमी करा, त्यामुळे शरीर आणि चव दोन्ही सहज जुळवून घेतील.
भारतीय स्वयंपाकघरांसाठी व्यवहार्य टीप्स
भारतामध्ये व्हेगन आहार स्वीकारणे म्हणजे आपले आवडते स्वाद गमावणे नव्हे. साधे पर्याय जसे की गायीच्या दुधाऐवजी सोया, बदाम किंवा ओट्सचे दूध वापरणे हा मोठा फरक घडवून आणू शकतो. मसूर, बीन्स, हरभरे आणि टोफू हे पनीरचे पौष्टिक प्रथिने हे पर्याय ठरतात. तूप किंवा लोण्याऐवजी थोड्या प्रमाणात हृदयास आरोग्यदायी असलेल्या तेलांचा वापर स्वयंपाक आरोग्यदायी ठेवतो. मसाले, हिरव्या पालेभाज्या व चटण्या वापरून जेवण चविष्ट, स्वादिष्ट आणि समाधानकारक बनवता येते.
भविष्यवादी एक दृष्टीकोन
भारतामध्ये मधुमेहाच्या उपचारासाठी व्हेगन आहार प्रमुख आहार यासाठी शिफारसीय ठरू शकेल का? या प्रश्नावर तज्ज्ञ आशावादी आहेत. वाढती जागरूकता, वनस्पती-आधारित पर्यायांची उपलब्धता आणि अधिक संशोधनामुळे, व्हेगन आहार लवकरच वैयक्तिक मधुमेह व्यवस्थापन योजनांचा एक अविभाज्य भाग बनू शकतो. या ‘जागतिक व्हेगन डे’ निमित्त लक्षात ठेवा की मधुमेहाचे व्यवस्थापन म्हणजे सजग, वनस्पती-आधारित आहाराचा निर्णय घेणे होय. हे दीर्घकालीन आरोग्याला पाठिंबा देते. रक्तातील साखर स्थिर ठेवते आणि एकूणच आरोग्य सुधारण्याचा मार्ग आहे.
-डॉ. चारुशिला ढोले, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे






