पुण्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण (फोटो- istockphoto)
पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र
महापालिकेकडून जनजागृती मोहिमेला वेग
वर्षभरात पुण्यात डेंग्यूचे २६४५ संशयित रुग्ण आढळले
सुनयना सोनवणे/पुणे: पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून जनजागृती मोहिमेला वेग देण्यात आला आहे. महापालिकेच्या (Health) कीटक नियंत्रण विभागाच्या जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील अहवालानुसार, वर्षभरात पुण्यात डेंग्यूचे २६४५ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी १०९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. चिकुनगुनियाचे २२ रुग्णही नोंदविण्यात आले आहेत.
दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. डेंग्यूविषयी जागरूकता निर्माण करणे, डासांची पैदास रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश असतो. राष्ट्रीय डेंग्यू दिन २०२६ ची संकल्पना ‘एक व्हा. कृती करा. निर्मूलन करा’ अशी असून, डेंग्यूशी प्रभावीपणे लढण्यासाठी सामूहिक सहभाग, वेळेवर उपाययोजना आणि सातत्यपूर्ण जनजागृती किती आवश्यक आहे, यावर या थीममधून भर देण्यात आला आहे. आरोग्य विभागानेही नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
डेंग्यू बरा झाल्यानंतरही जर दिसत असेल लक्षणं, तर हा असू शकतो पोस्ट …
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये सर्वाधिक ७६५ संशयित रुग्णांची नोंद झाली, तर जुलैमध्ये ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात एडीस डासांची पैदास वाढत असल्याने बांधकाम साईट्स, सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या, कुलर, कुंड्या आणि गच्च्यांवरील पाणी याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेकडून विविध भागांत तपासणी मोहीम राबविण्यात येत असून वर्षभरात ३०२९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सुमारे ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ आणि त्वचेवर पुरळ ही डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. ताप आल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील डेंग्यूची स्थिती –
संशयित रुग्ण : २६४५
पॉझिटिव्ह रुग्ण : १०९
चिकुनगुनिया रुग्ण : २२
डेंग्यूमुळे मृत्यू : शून्य
बजावलेल्या नोटिसा : ३०२९
वसूल दंड : ₹६.१९ लाख
सर्वाधिक रुग्ण : ऑगस्ट महिन्यात
5 लक्षणांसह येतोय डेंग्यूचा ताप, घरीच केले उपाय तर प्लेट्लेट्स होणार नाहीत कमी
डेंग्यूपासून बचावासाठी…
– घराभोवती पाणी साचू देऊ नका.
– कुलर, टाक्या आणि बादल्या नियमित स्वच्छ करा.
– पाण्याची भांडी झाकून ठेवा.
– पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा.
– मच्छर प्रतिबंधक क्रीम व जाळ्यांचा वापर करा.
– ताप आल्यास त्वरित तपासणी करा.
– आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळा.
– सोसायटी आणि बांधकाम परिसर स्वच्छ ठेवा.






