आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा शारीरिक त्रास उद्भवतात याला प्रत्येकवेळी बाहेरील खाणं पिणं किंवा वातावरणातील होणारे बदल हे इतकंच फक्त कारणीभूत नाही. असं म्हणतात की, शरीर आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे. तुमच्या मनाची स्थिती कशी आहे यावरुन देखील तुमचं आरोग्य ठरत असतं. शरीर आणि मनाचा संबंध कसा तर बहुतेकदा आपण घाबरलो की घाम फुटतो किंवा पोटात कळ येते. खूप जास्त विचार केला की डोकं दुखतं अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे सिद्ध होतं की, शरीर आणि मनाचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे. म्हणूनच जर मानसिक ताण तणाव असल्यास शरीर याचा परिणाम शरीरावर देेखील व्हायला सुरुवात होते.
मानसिक तणाव किंवा भावनिक नैराश्य यांच्या लक्षणांकडे पाहिलं तर, सतत चिंता वाटणं, काळजी करणं आणि भीतीची भावना मनावर खोलवर परिणाम करतात. तणावग्रस्त व्यक्ती पटकन चिडचिड करते किंवा रागावते. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी होत असतो, एकाग्रता राखता येत नाही आणि वारंवार नकारात्मक विचार मनात येतात. कधी कधी यामुळे नैराश्याचीही लक्षणं दिसू लागतात.
शारीरिक लक्षणांमध्ये डोकेदुखी, मायग्रेन, हृदयाचे ठोके वाढणं आणि सतत थकवा जाणवणं यांचा समावेश होतो. झोपेच्या समस्या ही तणावाचे संकेत आहेत. काहींना झोप लागत नाही, तर काहींना खूप झोप येते. याशिवाय पचनसंस्थेवर परिणाम होऊन गॅस, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होऊ शकतात. रक्तदाब वाढणं, स्नायूंमध्ये ताठरपणा आणि अंगदुखी ही लक्षणं सामान्य वाटत असली तरी मानसिक तणावाचा हा एक भाग असतो, असं मानसोपचार तज्त्रांचं म्हणणं आहेे. .
वर्तणुकीतील बदल हे तणावाचे तिसरे मोठे संकेत असतात. तणावाखालील व्यक्ती जास्त खातात किंवा खाणं टाळतात. काही वेळा धूम्रपान, मद्यपान किंवा इतर व्यसनांकडे आकर्षित होतात. कामात किंवा अभ्यासात लक्ष न लागणं, सामाजिक संबंध टाळणं आणि एकटं राहणं ही देखील लक्षणं आहेत. निर्णय घेण्यात अडचण येते आणि छोट्या गोष्टींवरून गोंधळ होतो.
तणावग्रस्त व्यक्ती सतत काळजीत असते. तिच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येतात. भीती, असुरक्षितता आणि अस्वस्थता जाणवते. अशा वेळी एकाग्रता कमी होते, निर्णय घेणं कठीण होतं. चिडचिडेपणा वाढतो आणि छोट्या गोष्टींवरून राग येतो. आत्मविश्वास घटतो व स्वतःविषयी असमाधान निर्माण होतं. दीर्घकाळ तणाव राहिला तर नैराश्य किंवा चिंताजन्य विकार उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
याच ताण तणावावर तज्ज्ञांकडून काही उपाय देखील सांगितले जातात.
तणाव कमी करण्याचे उपाय
तणावावर मात करणं शक्य आहे, पण त्यासाठी जीवनशैलीत काही बदल आवश्यक आहेत. विचांरामधील बदल आणि आहारा पौष्टीक घटकांचा समावेश केल्यास ताण तणाव कमी होतो.
योग व ध्यान: मन शांत ठेवण्यासाठी दररोज किमान 15-20 मिनिटे ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करणं फायदेशीर ठरतं.
शारीरिक व्यायाम: चालणं, सायकलिंग, पोहणं किंवा इतर व्यायाम शरीरात एंडॉर्फिन्स तयार करून तणाव कमी करतात.
समतोल आहार: पौष्टिक आहार शरीराला ऊर्जा देतो व मानसिक स्थिरता राखतो.
छंद जोपासणं: आवडते छंद केल्याने मन सकारात्मक राहते.
सामाजिक आधार: मित्र-परिवाराशी संवाद साधल्याने मन हलकं होतं.
तज्ञांचा सल्ला: लक्षणं तीव्र असतील तर मानसोपचार तज्ञ, समुपदेशक किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.