फोटो सौजन्य - Social Media
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या मदतीसाठी कॅनकिड्स किड्सकॅन या स्वयंसेवी संस्थेने आणि बांसुरी म्युझिक ग्रुपने संयुक्तपणे ‘सुनेहरे स्वर- बन जायेंगे गोल्ड’ ही धर्मादाय संगीत मैफिल सादर केली. 9 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश ‘केअर फॉर किड्स विथ कॅन्सर’साठी निधी उभारणे हा होता. बाल्यावस्थेतील कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि उपचारांसाठी मदत पुरवणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत देओल, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, तसेच डॉ. पूर्णा कुरकुरे उपस्थित होते. डॉ. राहुल जोशी, राजेश अय्यर आणि संगीता मळेकर यांनी लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांच्या अमर गीतांवर आधारित सादरीकरण करून वातावरण भारून टाकले.
कॅनकिड्स संस्थापिका पूनम बागई म्हणाल्या, “संगीत जेव्हा ध्येय साध्य करतं, तेव्हा ते आशेला नवी उभारी देतं. आम्ही महाराष्ट्रातील बालकर्करोग रुग्णांसाठी सुमारे 3.5 कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.5 कोटी रुपये टीएमएच मुंबईतील 1,000 मुलांच्या आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आणि 2 कोटी रुपये नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापूरसह प्रादेशिक केंद्रांसाठी वापरण्यात येतील.”
डॉ. बाणावली यांनी सांगितले की, “बाल्यावस्थेतील कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र वैद्यकीय उपचारांसोबत शिक्षण, समुपदेशन आणि पोषण यासाठी मदत आवश्यक आहे.” रणजीत देओल यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शासकीय सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रेक्षकांनी मुलांसोबत गाणं-नाच करत भावनिक वातावरणात या मैफिलीचा आनंद घेतला. “कॅन्सर को ढिशूम ढिशूम! बन जायेंगे गोल्ड” या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली. ही मैफिल केवळ संगीत नव्हे, तर आशा, प्रेरणा आणि मानवतेचा संदेश घेऊन संपन्न झाली.






