राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागांवर निवडणूक बिनविरोध; 15 जागांसाठी झाले मतदान

देशातील सर्वोच्च असे सभागृह असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 15 जागांसाठी आज मतदान पार पडले.

    नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च असे सभागृह असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 15 जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यसभेच्या ज्या 15 जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील 10, हिमाचल प्रदेशमधील एक आणि कर्नाटकमधील 4 जागांचा समावेश आहे.

    कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेसने 3 आणि भाजपा-जेडीएस आघाडीने 2 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विधानसभेचे 224 सदस्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 135 आमदार आहेत. तर भाजपचे 66 आणि जेडीएसचे 19 आमदार आहेत. दोन अपक्ष आणि इतर 4 आमदार आहेत. कर्नाटकात राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून काँग्रेस आणि भाजप-जेडीएस आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

    दरम्यान, या राज्यसभा निवडणुकीत सर्वच राज्यांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विरोधकांना धक्का देत त्यांची मते फोडण्यात यश मिळवलं. मात्र, कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपला धोबीपछाड देत एक आमदार फोडण्यात यश मिळवलं. भाजपचे आमदार एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं आहे.