शिवसेनेचा आज वर्धापन दिन; शिंदेंच्या शिवसेनेत उत्साह तर ठाकरे गटात अस्वस्थता
नागपूर : शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्षात शिंदे गटात उत्साही वातावरण तयार होत आहे. तर, ठाकरे गटात अस्वस्थता असून, शिवसैनिकांची घालमेल सुरू आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे व शिंदे गटाने पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सुरुवातीच्या काळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणि खासदारांच्या स्वतंत्र गटाने ठाकरे गटातील शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. याउलट शिंदे सेनेतील सैनिकांचा उत्साह वाढतच होत चालला आहे.
शिवसेनेचा शुक्रवारी वर्धापन दिवस आहे. हिरक महोत्सवी वर्षात ठाकरे सेनेला जबरदस्त धक्के बसत आहेत. याची सुरुवात चार वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून ठाकरे गटाला सातत्याने खिंडार पाडले जात आहे. यानंतरही पक्षाकडून स्थानिक पातळीवरील शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेश होत असला तरी शिवसैनिकांचे प्रमाण आजही तुलनेने कमी असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तीन वर्षांत कोणत्याच निवडणुका नाही. त्यामुळे या प्रदीर्घ काळात शिवसैनिकांना सांभाळताना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शिवसेना पदाधिकारी वा शिवसैनिकांच्या व्यथांची दखल घेतली जात नाही, अशी खंत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे दोन तर, शिंदे गटाचा एक नगरसेवक निवडून आला. भाजपने महायुतीचा धर्म पाळत जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली. त्यामुळे आता दोन्ही गटांचे संख्याबळ समान झाले आहे.
शिंदे गटालाही डरकाळी फोडता आलेली नाही
ठाकरे गटात अस्वस्थता असली तरी शिंदे गटालाही डरकाळी फोडता आलेली नाही. मात्र, त्यांनी नागपूर-विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच ठाकरे गटाचे नितीन तिवारी यांनी मशाल सोडून शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. राज्यात सत्तेत असतानाही पक्षाकडून या भागात फारसे लक्ष दिले जात नाही, अशी भावना शिंदे गटाच्या असंतुष्ट शिवसैनिकांनी व्यक्त केली.






